श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्ठीची सांगता,यात्रेनिमित्त जेजुरी गडावर आकर्षक रोषणाई व आकर्षक फुलांची आरस

जेजुरी वार्ता :- अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत ,मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर श्री क्षेत्र जेजुरी गडावर खंडेरायाच्या चंपाषष्टी यात्रेची आज दिनांक 9 डिसेंबर 2021 म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला सांगता होतेय.या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर आकर्षक रोषणाई व आकर्षक फुलांची आरस करण्यात आली आहे.

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामध्ये गुरुवारी सनई-चौघड्याच्या निनादात चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात आला. ०५ ते ०९ डिसेंबर षड्‌रात्रोत्सव (शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी) पर्यंत गडामधील नवरात्र महालामध्ये खंडोबाचे घट बसवण्यात आले होते.

या सहा दिवसाच्या काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने ऎतिहासिक गड उजळला होता तर मुख्य मंदिर व देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी ,पानांनी सजविण्यात आला होता. हे दृश्य अतिशय मनमोहक डोळ्यांची पारणे फेडणारे होते. आज पहाटे स्थानिक मानकरी-ग्रामस्थांच्या पूजा व अभिषेक झाले. त्यानंतर देवाचे घट उठवण्यात आले.हजारो भाविकांनी आज भंडारा- खोबऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात गडावर देवाचे दर्शन घेतले.

रात्री जेजुरी गावातून प्रथेप्रमाणे तेल हंड्याची मिरवणूक काढण्यात आली. या हंड्यात ग्रामस्थांनी तेल ओतले. सनई-ढोल वाजवीत हा तेल हंडा खंडोबा गडावर नेण्यात आला. रात्री देवाला या तेलाचे तेलवण करुन हळद लावण्यात आली.

पौष पोर्णिमेला खंडोबा-म्हाळसादेवीचा विवाह पाली (जि.सातारा) येथे केला जातो. या लग्नाची हळद जेजुरी गडावर खंडोबाला लावली जाते. या निमित्त गडावर फराळाचा रुखवतही मांडण्यात आला होता.चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी खंडोबाला श्रद्धापूर्वक वांग्याचे भरीत, रोडगा, पुरणपोळी, कांद्याची पात आदी नैवेद्य अर्पण केले. साऱ्या महाराष्ट्रात आज घराघरात बसविलेले खंडोबाचे घट उठवण्यात आले. तळी-आरती करुन देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवण्यात आला.तसेच जागर गोंधळ चा कार्यक्रम पार पडला

चंपाषष्ठी पासून चातुर्मास पाळणारे भाविक कांदा, वांगी, लसूण खाणे सुरुवात करतात. त्यामुळे चंपाषष्ठी उत्सवाला खूप महत्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडावर भाविकांना तोंडाला मास्क लावणे, काळजी घ्या अशा सूचना वारंवार खंडोबा देवस्थानच्या वतीने दिल्या जात होत्या.

मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी खंडोबाने मार्तंड भैरव अवतार धारण करून या दैत्यांचा वध केला. म्हणून या उत्सवास देवदिवाळी असे म्हणतात. जेजुरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भंडार-खोबरे मोठ्या प्रमाणात खरेदी करुन खंडोबाला अर्पण केले. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने दररोज भाविकांना भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच देवस्थान कडून मल्हार महोत्सव, महाराष्ट्राची लोकधार ,महाराष्ट्राची संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच ह्या षड्‌रात्रोत्सव मध्ये (शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी) पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
विजयाचं महाप्रतिक असलेल्या चंपाषष्टी यात्रेला वेगळं स्थान आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने:
महाराष्ट्र:
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी
२) निमगाव (खेड तालुका,पुणे)
३) पाली-पेंबर सातारा
४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद)
५) शेंगुड (अहमदनगर)
६) सातारे (औरंगाबाद)
७) माळेगाव

कर्नाटक:
१) मैलारपूर-पेंबर (बिदर)
२) मंगसूल्ली (बेळगाव)
३) मैलारलिंग (धारवाड)
४) देवरगुडू (धारवाड)
५) मण्मैलार (बल्ळारी).

लाखो भाविकांचे कुलदैवत श्री खंडोबा आहे,चंपाषष्टीला खंडोबाचा मार्तंड भैरव अवतार प्रकट झाला, व त्याने मणी-मल्ल दैत्यांचा संहार केला,सर्व देवदेवतांना वरदान लाभले म्हणुन चंपाषष्टीला महत्त्व आहे,कुल धर्म,कुलाचार,तळी भंडार करण्याची खंडोबा भक्तांची प्रथा आहे,

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!