उपविभागीय अधिकारी यांना बाळासाहेब सोरगिवकर यांच्या नेतृत्वात निवेदन
चांदूर रेल्वे – धीरज पंवार/ सुभाष कोटेचा
नांदगाव खंडेश्वर जवळील लोणी (टाकळी) येथील मातंग समाजाच्या एका महिलेवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करा अशी मागणी धामणगाव विधानसभा क्षेत्रातील मातंग समाज कृती समितीच्या वतीने मातंग समाजाचे नेते बाळासाहेब सोरगिवकर यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी यांना सोमवारी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील निवासी एक मातंग समाजाची महिला माहेरी लोणी (टाकळी) येथे पाहुणे म्हणून गेली असता ४ डिसेंबर रोजी बेपत्ता झाली व त्यानंतर ५ डिसेंबरला लोणी येथे तिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर तिच्यावर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील दलित समाज हा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याच्या मनस्थितीत येऊ शकते. परिणामी राज्यात जातीय तेढ सुद्धा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा योग्य विचार विनिमय करून सदर प्रकरणातील आरोपीस तात्काळ विनाविलंब अटक करून शोकग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळावा अन्यथा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मातंग समाज कृती समिती, धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रा च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बाळासाहेब सोरगिवकर, योगेश अंभोरे, अनिल वानखडे, वसंता वानखडे, गुणवंत वानखडे, सुभाष पाळण, अमोल खंडारे, अनिल लोखंडे, प्रभाकर वानखडे, दिलीप कलाने, गजानन लोखंडे, पवन वानखडे, सचिन तायडे, सुनील वानखडे, नितेश वानखडे, नितेश लोखंडे, सतीश वानखडे, कार्तिक आमटे, गौरव वानखडे, मुकेश वानखडे, शिवराय वानखडे, अमोल लोखंडे, शुभम लोखंडे यांसह अनेकांची उपस्थिती होती.