टोपे साहेब, परिक्षार्थ्यांना टोप्या घालणे थांबवा ! भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांची मागणी, ब्लॅकलिस्टेड न्यासाचा पून्हा गोंधळात गोंधळ उघड
प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम वार्ता : आरोग्य विभागाच्या परिक्षांमध्ये ब्लॅकलिस्टेट न्यासाने पून्हा केलेला गोंधळ परिक्षार्थ्यांच्या मुळावर उठू पाहतोय. दोन पदांसाठी परिक्षा देणाऱ्यांना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परिक्षा केंद्र देण्यात आले असून धक्कादायक बाब म्हणजे उभय केंद्रातील अंतर शेकडो किलोमीटर आहे. टोपे साहेब न्यासाकडून विद्यार्थ्यांना टोप्या घालणे थांबवा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांनी केली.
राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा दोन महिन्यात भरणार अशी वल्गना करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सहा महिने उलटून गेल्यानंतर केवळ क व ड वर्गाच्या ६१९१ पदांसाठी परीक्षा घोषित केली होती. परंतु देशातील ६ राज्यांमध्ये काळ्या यादीत असलेल्या व अनेक गुन्हे नोंद असलेल्या न्यासा या कंपनीला महाराष्ट्रातील परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले. यापूर्वी अनेक राज्यातील परिक्षांमध्ये गोंधळ घातलेल्या न्यासाने महाराष्ट्रातही त्याचीच पुनरावृत्ती केली. परिणामी मविआ सरकारवर ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. परंतु त्यातूनही सरकारने धडा न घेता आरोग्य विभागातील पदभरतीच्या परीक्षा घेण्याचे काम न्यासा कडेच का कायम ठेवले हा कळीचा मुद्दा असल्याचे मत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांनी व्यक्त केले.
गत वेळी परिक्षा ऐन तोंडावर असताना अनेकांचे प्रवेशपत्र मिळाले नव्हते, प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नव्हते. त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची या संभ्रमाने विद्यार्थ्यांना ग्रासले होते. शेवटी राज्य सरकारला परिक्षा रद्द करावी लागली होती. यावेळी तर न्यासाने कहरच केला आहे. दोन पदांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पदांसाठी परिक्षा देणाऱ्यांना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परिक्षा केंद्र देण्यात आले असून धक्कादायक बाब म्हणजे उभय केंद्रातील अंतर शेकडो किलोमीटर आहे.
परिणामी त्यांना एका पदाच्या परिक्षेला मुकावे लागणार आहे. दुसरी बाब म्हणजे परिक्षार्थ्यांनी मागितले एक आणि त्यांना देण्यात आले दुसरेच केंद्र. तेही शेकडो किलोमिटर दुरचे. हा सर्व प्रकार परिक्षार्थ्यांची संधी हिसकाविणारा व त्यांना आर्थिक भूर्दंड देणारच म्हणावा लागेल. टोपे साहेब न्यासाकडून विद्यार्थ्यांना घालण्यात आलेल्या या टोप्यांवर तात्काळ उपाययोजना करा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नागेश घोपे यांनी केली.
परिक्षार्थ्यांना एसटी प्रवासाचा मोफत पास द्या !
गत वेळी परिक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षेला अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. आता पुन्हा शेकडो किलोमिटर अंतरावरील परिक्षा केंद्र दिल्यामुळे त्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. राज्य सरकारने परिक्षार्थ्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा विचार करून त्यांना परिक्षा केंद्रावर प्रवास करण्यासाठी एस टी चा मोफत पास देण्यात यावा अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस नागेश घोपे यांनी सरकारकडे केली असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.