आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगाजी राचुरे यांचे मत
चांदूर रेल्वे – धीरज पंवार\सुभाष कोटेचा
जानेवारी मध्ये आम आदमी पार्टीने ग्रामपंचायतच्या ३०० पैकी १४५ जागा नुकत्याच जिंकल्या. त्यामुळे पार्टीला असा विश्वास आला की, नागरिक आम्हाला निवडून देण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका लढवायच्या असा निर्णय पार्टीतर्फे घेण्यात आल्याचे मत आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगाजी राचुरे यांनी व्यक्त केले. ते चांदुर रेल्वे शहराच्या दौऱ्यावर सोमवारी आले असता पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आम्ही जेथे महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुका आहे, तेथील दौरे करतोय. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महाराष्ट्राचा दौरा करीत असून सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत. चांदूर रेल्वे येथे आम आदमी पार्टीचे कार्य चांगल्या प्रकारे असून निवडणुकीत आम्ही चांदूर रेल्वे नगर परिषद ला ताब्यात घेऊ व महाराष्ट्रात पहिली नगर परिषद चांदूर रेल्वे ची यावी ही पार्टी ची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी व सातत्याने कार्यकर्त्यांना गरज पडेल तेव्हा पार्टीचे नेतृत्व याठिकाणी येईल. आप पार्टी सच्चाई च्या मार्गाने राजकारण करते आहे, या राजकारणाचा उत्साह लोकांत निर्माण व्हावा ही जबाबदारी स्थानिक लोकांना दिली असून ती जबाबदारी ते पार पाडणार असल्याचे महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांनी म्हटले. सोमवारी सायंकाळी ४ वाजता आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगाजी राचुरे, सहसंयोजक किशोरजी मांध्यान, विजयजी कुमार, सरचिटणीस धनंजय शिंदे, कोषाध्यक्ष जगदीशसिंग, विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे ही महाराष्ट्राची कोअर टीम स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्याकरिता चांदूर रेल्वे शहरातील विश्रामगृह येथे आली होती. सर्वप्रथम माजी न.प. उपाध्यक्ष तथा आम आदमी पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी यांनी प्रास्ताविकातून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला व स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. यानंतर सदर कोअर टीमने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेऊन वॉर्डनिहाय कमेटी बनविण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी नितीन गवळी यांच्या कार्याचे सदर टीमने कौतुक सुध्दा केले.
यावेळी आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, सागर गावंडे, चरण जोल्हे, पंकज गुडधे, दत्ताजी नेमाडे, पंकज मालपे, विनोद लहाने, श्याम भेंडकर, मंगेश डाफ, बाळासाहेब ढोके, गणेश क्षिरसागर, नीलेश होले, प्रशांत ढोले, मधुकरराव शेळके, संजय पवार यांसह अनेकांची उपस्थिती होती.