महिला सक्षमीकरण कार्याबद्दल संविधान जनजागृती अभियान संयोजन समितीचे केला गौरव
प्रतिनिधी ओम मोरे:-
अमरावती ०४ डिसेंबर : आपल्या निवेदन कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या तसेच महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत अग्रणी राहून महिलांचे प्रबोधन घडवून आणणाऱ्या क्षिप्रा मानकर यांना भारतीय संविधान जनजागृती अभियान संयोजन समितीच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा भारतीय संविधान जनजागृती विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी महिलांचे सशक्त संघटन असलेल्या जीजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र च्या त्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख असून सद्या आरसीएन डिजिटल मीडिया ब्रॉडकास्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत .
महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत अग्रणी राहून क्षिप्रा मानकर यांनी आपल्या व्याख्यानांमधून जाणीव जागृती , प्रबोधन करून महिलांचे वैचारिक परिवर्तन सुद्धा घडवून आणले . तसेच विद्यार्थीदशेपासून त्यांनी सामाजिक ,सांस्कृतिक व पत्रकारिता , विद्यार्थी चळवळ , युवक चळवळ आदी कार्यात सहभाग दर्शवून प्राविण्य प्राप्त केले. उत्कृष्ट वत्कृत्व व वाद विवाद पटू अशी ओळख असलेल्या क्षिप्रा मानकर यांनी शासनाच्या विविध योजनांवर सुद्धा काम केले आहे.
प्रेरणांकुर बहुउद्देशिय विकास व शिक्षण संस्था, अमरावती, पे बँक टू सोसायटी, सदधम्म बुध्द विहार, मार्डी रोड, अमरावती व सहयोगी संस्था यांचे वतीने घर घर संविधान, गाव गाव संविधान या मोहिमेअंतर्गत भारतीय संविधान जनजागृती अभियानाचा शुभारंभ सदधम्म बुद्ध विहार, मार्डी रोड, अमरावती येथून करण्यात आला . या कार्यक्रमा दरम्यान क्षिप्रा मानकर यांना भारतीय संविधान जनजागृती विशेष पुरस्कार बहाल करून मोठ्या सन्मानाने गौरविण्यात आले. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सेवा निवृत्त परीक्षा नियंत्रक, डॉ. भी. र. वाघमारे, तर विशेष अतिथी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र चे झोनल अधिकारी राहुल वाघमारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. नितीन कोळी, जेष्ठ आंबेडकरी साहित्यीक, डॉ. प्रा. सुरेंद्रजी मांडवधरे , तसेच संयोजन समितीचे अरुणकुमार आठवले, हर्षल बनसोड, अँड प्रा. पी. के. राऊत, प्रा. हरिभाऊ गजबे, कैलाश रोडगे, मिलींद लोणपांडे, पो. एन. दंदे, प्रा. रेश्मा मोहोड, प्रा. दिप्ती नेहर आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या सत्काराला उत्तर देतांना क्षिप्रा मानकर यांनी पुरस्कारातून आणखीन काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे सांगून आयोजकांच्या उपक्रमाची प्रशंसा केली .महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडवायचा असेल तर जातीची व विषमतेची बंधने तोडून समता प्रस्तापित करण्याचे आवाहन क्षिप्रा मानकर यांनी केले .
या पुरस्कारासाठी लेडी गवर्नर कमलताई गवई, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरी भदाणे, कार्याध्यक्ष नंदा शींदे , प्राचार्य डाॅ अनुराधा वऱ्हाडे , प्रा. डाॅ नयना दापूरकर, प्राचार्य दिलिपसिंह खांबरे, अरविंद गावंडे, जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी , सचिव संजय ठाकरे, नवोदय विद्यालय अमरावती मित्रपरिवार, तसेच अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले