दर्यापूर – महेश बुंदे
“इकडे लक्ष द्या बे पोटेहो”, “अबे डोमळ्या कवा सुधरशीन तू”, अशा आपल्या ग्रामीण बोलीभाषेमुळे कोरोना काळात अल्पावधीतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले विदर्भाचे सुपुत्र वर्धा येथील रहिवासी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे “कराळे मास्टर” याच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि. ५ डिसेंबर रविवार रोजी सकाळी ११ वाजता येथील शेतकरी सदन मध्ये “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ” सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दर्यापूरचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी.डाबेराव, महाराष्ट्र फायन्स अँड अकाउंट सर्व्हिस असिस्टंट डायरेक्ट विजय देशमुख, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कौलखेडचे डेप्युटी मॅनेजर प्रणित विल्हेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा उपस्थितीत दर्यापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील १० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर लाखो चहाते असणारे प्रा. नितेश कराळे सरांचे दर्यापूर नगरीत प्रथमता आगमन होत असल्याने या संधीचा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व पालक व नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आशिष शिवाजीराव देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
याप्रसंगी कोविडशिल्ड लसीकरणाचे देखील आयोजन
सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने नागरिकांसाठी कोविडशिल्ड लसीकरणाचे पण आयोजन कार्यक्रम स्थळी करण्यात आले आहे. तरी याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.