चाकण वार्ता :- काल १४ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यातील उत्तरेच्या म्हणजे देशमुख आळीच्या बाजूकडील भिंतीवरून फिरत असताना एक कुत्रा चुकून भिंतीवरील वाढलेल्या झुडपात पडला व त्याच झुडपात अडकून राहिला. खंदकापासून अंदाजे ३०-३५ फूट उंचीवर असल्याने तसेच झुडपात कठिण अवस्थेत अडकल्यामूळे त्याला ओरडण्या आणि विव्हळण्याशिवाय पर्याय नव्हता.
आजूबाजूच्या सोसायट्यांमधील लोकांनी आवाज ऐकूनही रात्र आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं.
सकाळी सुद्धा लोक कुत्र्याची ती बिकट अवस्था पाहून निघून जात होते परंतू सोसायटीच्या पवार ताई व गोरे ताई यांना कुत्र्याची ती अवस्था पहावत नव्हती. नगरपरिषदेला कळविले असता अशी कोणती रेस्क्यू टीम आपल्याकडे नसल्याचं कळवलं. शेवटी न राहून त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्पमित्र विशाल धाडगे यांना संपर्क केला. लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असणारा विशाल तात्काळ तिथे पोहोचला.
विशालने परिस्थिती पाहून काही तज्ञ व रेस्क्यू आॅपरेशनमध्ये निष्णात असलेल्या कार्यकर्त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला परंतू तात्काळ कोणी उपलब्ध होऊ शकत नसल्याने तसेच कुत्र्याची होत चाललेली दयनीय स्थिती पाहून विशालने स्वत:हा दोरी बांधून भिंतीवरून उतरण्याचा निश्चय केला. तोपर्यंत घटनास्थळी दाखल झालेल्या समाजसेवक प्रतिक जाधव, हर्षद चौरे, योगेश चौरे, हितेश घुगरे यांनी याकामी विशालला योग्य ती मदत करण्याची व त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आणि सुरू झाले रेस्क्यू ऑपरेशन.
सुरूवातीलाच भिंतीवरील काटेरी झुडपांमूळे रक्त बंबाळ झालेला विशाल न डगमगता खाली उतरला. भेदरलेला कुत्रा चावण्याचा प्रयत्न करू लागला. विशालने जिवावर बेतू शकणार्या त्या परिस्थितीत शर्थीचे प्रयत्न करून कुत्र्याला सुखरूप मुक्त केले.



काल परवा पुण्यात एका शाळकरी मुलीवर वार होत असताना बघ्याची व पळकुट्यांची भुमिका घेणारे लोक समाजात होत असलेल्या माणूसकीच्या अंताचं उदाहरण घालून देतात परंतू विशाल सारखे तरूण नेहमीचं अशाप्रकारे स्वत:च्या जिवापेक्षा परोपकार नेहमीचं श्रेष्ठ असल्याची वेळोवेळी उदाहरणं घालून देतात. विशालने सिद्ध केलयं माणूसकी अजून जिवंत आहे.
या घटनेकडे दुर्लक्ष करून जर कुत्रा दुर्दैवी अवस्थेत तडफडत मेला असता तर अनेकांनी माणूसकी संपल्याच्या नावाने उर बडवून घेतला असता. आज विशालच्या भिमपराक्रमाने हि वेळ टळली. त्याच्या धाडसाचं व माणूसकीचं कौतुक होणं गरजेचे आहे म्हणून हा लेखनप्रपंच करीत आहे.
तुम्हीही फोनवर विशालला शाबासकी नक्की द्या.
(विशाल मोहन धाडगे- 8446054044)