दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील शेतकर्यांच्या
शेतातील कृषिपंपाचा वीजपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित केल्या जात असून यावर ३० जानेवारीपर्यंत स्थगिती द्यावी, अशा आशयाचे निवेदन यापूर्वी दर्यापूर शिवसेनेच्या वतीने महावितरण कंपनीला देण्यात आले होते. या निवेदनावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने गुरुवारी शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयसमोर रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपकार्यकारी अभियंत्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून जाळण्यात आली. यावेळी ३१ रक्तदात्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग दर्शविला होता. शिवसेनेच्या शेतकर्यांच्या शेतातील वीजतोडणी विषयीच्या मागण्या पूर्ण न झाल्याने उपकार्यकारी अभियंता चेतन मोहोकर यांच्या दालनातील खुर्ची बाहेर काढून ती संतप्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेटवून दिली. वरिष्ठा अधिकार्यांनी तात्काळ लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
