प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे:- खेड तालुक्यात ऐन हिवाळ्यात सकाळ पासुन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील नागरिकांना महाबळेश्वरचा अनुभव आल्याचा भास झाला.तसेच सकाळ पासूनच पावसाबरोबर धुक्याची चादर पसरल्याने सगळीकडे अंधारून आले होते.या अवकाळी पावसाने, व धुक्याने शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसणार आहे.

ऐन हिवाळ्यात डिसेंबर महिना चालु होत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली.सकाळपासून चालूं झालेल्या पावसाने तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी केले. त्यातच कालच आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ शतकोत्तर संजीवनी सोहळा पार पडला.त्यामुळे राज्य भरातून आलेल्या वारकऱ्यांची, व नागरिकांची एकच तारांबळ उडालेली पाहायला मिळत होती. पावसाबरोबर धुक्याची चादर पसरल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना होणार आहे. शेतातील उभ्या पिकांना यामुळे कीडीची, रोगाची लागण होऊन खराब होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम संपल्यानंतर लागवड केलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसनार असल्याने ह्या वर्षी तालुक्यात कांदा उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील मका, फ्लॉवर, कोबी, वांगी, शेंगा, कोथिंबीर, मेथीच्या भाज्यांना देखील खराब होण्याची शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे खराब हवामान,दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि त्यातच कोरोना काळात महावितरणने लादलेली बिले असा तिहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. त्यामुळे सर्व जगाला खाऊ घालणारा बळीराजा मात्र निसर्गाच्या संकटामुळे उपाशी राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

एकूणच अवकाळी पावसाने, खराब हवामान यामुळे शेतातील होणारे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे.

