सविधांनामुळेच शेतकऱ्यांच्या समोर झुकले मोदी सरकार : -प्रा.जावेद पाशा कुरेशी
दर्यापूर – महेश बुंदे
भारतीय नागरिकांना जगण्याचे स्वतंत्र देणारे भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ असून राज्यकर्त्यांना सुद्धा सामान्य नागरिकांच्या समोर झुकावे लागते, एवढी ताकद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात आहे,म्हणूनच शेतकरी आंदोलनाच्या समोर झुकत केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारला सुद्धा झुकविण्याची ताकद संविधानाने नागरिकांना दिली,भारतीय संविधान नसते तर वर्षभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन स्थळीच सरकारने चिरडले असते,असे प्रतिपादन भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा.जावेद पाशा कुरेशी यांनी केले.
ते दर्यापूर येथील संविधान चौकात दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान सन्मान परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात “भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले संविधानिक अधिकार” या विषयावर बोलत होते.

अलीकडे भारतीय चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने भारतीय स्वातंत्र्य लढा यावर केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर कोणताही राजकीय नेता आक्षेप घेत नाही ही देशाची शोकांतिका आहे.भारतीय नागरिकांना देशांची व्यवस्था बदलाची ताकद संविधानाने ‘मतदानाचा हक्क’देऊन दिली आहे,पण नागरिक त्याचा कोणत्याही फायदा घेत नाहीत,असेही ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार हीच आपल्या देशाच्या लोकशाहीची खरी ताकद आहे,देशातील आजची भयवाय परिस्थिती बदलाची असेल तर सुजाण नागरिक म्हणून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे ते म्हणाले.
