संविधानावर विश्वास असून त्यानुसार काम होण्यासाठी प्रयत्नशील – नितीन गवळी
चांदूर रेल्वे – (सुभाष कोटेचा \ धिरज पवार )
चांदूर रेल्वे शहरात गाडगेबाबा मार्केटमध्ये आम आदमी पार्टीतर्फे संविधान दिवस व पक्षाचा स्थापना दिवस शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “आप” तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरवासी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. विजय रोडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते राजाभाऊ भैसे, आप नेते मेहमूदभाई हुसेन, गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव खंडार, बंडूभाऊ यादव, विनोद जोशी आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन सुद्धा करण्यात आले.
आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गावडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून म्हटले की, समर्पित कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण देशात ‘आप’ची वाढ वेगाने होत आहे. आमदार, खासदार यांना मिळणाऱ्या मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सेवा गरिबांपर्यंत नेण्यासाठी आम आदमी पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतासाठी खूपच महत्वाचा असुन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला होता. ९ वर्षांपुर्वी आमच्या पक्षाची स्थापनाही संविधान दिनी केली होती. संविधानावर आमचा विश्वास असून त्यानुसार काम व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही नितीन गवळी यांनी म्हटले.
