आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या विकास निधीतून जवाहर नगरात सुसज्य रस्त्यांचे जाळे मूलभूत सुविधांची अनेक विकासात्मक कामे मार्गी
प्रतिनिधी ओम मोरे:-
अमरावती २६ नोव्हेंबर : अमरावती शहराचा झपाटयाने विस्तार होत असून नव्याने लोक वसाहती उदयास येत आहेत. या भागात नागरिकांना रस्ते, नाली, नियमित जलापूर्ती, क्रीडांगण, सौदर्यीकरण या सारख्या पायाभूत सुविधांची पूर्तता करून त्यांचे जीवनमान उंचावण्याला घेऊन आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्वोतोपरी प्राधान्य दिले आहे.
शहरात विकास कामांचा झंझावात सुरू असतांना त्यात नावीन्यपूर्ण विकास कामांची देखील भर पडली आहे. याच शृंखलेत आमदार महोदयांनी जवाहर नगर भागात मूलभूत सुविधांच्या कामाचा धडाका लावला असल्याने स्थानिकांना विकास पर्व अनुभवास मिळत आहे. अशातच मूलभूत सोयी सुविधांच्या विशेष अनुदानातून जवाहर नगर भागातील पुष्पगंधा कॉलोनी व हरिओम कॉलोनी येथे १०.५० लक्ष निधीतून रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तर बालाजी नगर येथील डीपी रोडचे सुद्धा ६ लक्ष निधीतून डांबरीकरण करण्यात येत आहे. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत भूमीपूजनाची औपचारिकता साधली.
दरम्यान स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांच्या शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना आमदार महोदयांनी सांगितले की थेट भेट -थेट संवादाच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यास आपले प्राधान्य असून विकासाची शृंखला अविरत सुरू राहण्यासाठी प्रयत्नरत आहोत, आगामी काळात जवाहर नगर भागात आणखीन विकासात्मक बाबींची उपलब्धता करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने देण्यात आली. यापूर्वी सुद्धा जवाहर नगर परिसरात ५१.३९ लक्ष निधीतून मूलभूत सुविधांच्या विकास कामांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यात आणखीन १६.५० लक्ष निधीतील विकास कामांची भर पडली आहे.
