नांदगाव खंडेश्वर दि. १७ (प्रतिनिधी)- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संक्रमणामुळे तब्बल ६०५ दिवसांपासून बंद असलेल्या अमरावती-वर्धा मेमू पॅसेंजर ट्रेन चे टिमटाळावासियांनी जंगी स्वागत केले असून परिसरातील प्रवाशांना पॅसेंजर ट्रेन सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरोना काळात देशातील सर्व रेल्वे वाहतूक सेवा बंद करण्यात आल्यानंतर छोट्या मोठ्या स्थानकावर थांबा असलेल्या पॅसेंजर गाड्या सुद्धा बंद करण्यात आल्याने जनसामान्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता. मध्य रेल्वे नागपूर विभागातील पहिल्या आणि परिसरात नावाजलेल्या टिमटाळा रेल्वे स्टेशनवर मेल/एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने परिसरातील प्रवाशी नागरिकांतर्फे पॅसेंजर मेमु ट्रेन सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने मध्य रेल्वे नागपूर विभागाद्वारे अमरावती-वर्धा पॅसेंजर मेमू ट्रेन चा शुभारंभ करित जनसामान्यांना दिलासा दिला. अमरावती वरून सुटणारी गाडी क्रमांक ०१३७१ अमरावती-वर्धा पॅसेंजर मेमु ट्रेन टिमटाळा रेल्वे स्थानकावर येताच परिसरातील नागरिकांप्रमाणे टिमटाळावासियांनी जंगी स्वागत केले. तर ६०५ दिवसांनंतर सुरू झालेल्या पॅसेंजर ट्रेन चे पहिले तिकिटधारक होण्याचा मान टिमटाळा निवासी श्रीपाल सहारे यांनी मिळवला असून टिमटाळा स्टेशनचे स्टेशन मास्तर सतिशजी अढाऊ साहेब यांनी कोविड नियमांचे पालन करीत युनिव्हर्सल पास बघून टिमटाळा ते वर्धा दरम्यानचे प्रथम तिकीट (क्र. ८७१५) श्रीपाल सहारे यांना देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अमरावती-वर्धा रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी वरदान ठरणा-या या पॅसेंजर मेमु ट्रेन ला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करित कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ही मेमू पॅसेंजर ट्रेन टिमटाळा स्टेशनवरून वर्धेकडे संध्याकाळी साडेतीन वाजता सुटेल तर सकाळी टिमटाळा स्टेशनवरून अमरावतीकडे सकाळी साडेअकरा वाजता निघेल. ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या प्रवासी रेल्वे गाडीचे पहिले तिकीट कोणी काढले हे सांगणे कठीण असले तरी जवळपास सहाशे पाच दिवसांनंतर पुन्हा सुरू झालेल्या पॅसेंजर ट्रेन चे टिमटाळा स्टेशनवरील तिकीट हे श्रीपाल सहारे यांच्याच नावावर असेल यात शंका नाही.
“पॅसेंजर मेमु ट्रेन सुरु झाल्याने जनसामान्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी पॅसेंजर ट्रेन चे प्रवाशी भाडे हे मेल/एक्सप्रेस च्या प्रवासभाड्याईतकेच असल्याने जनसामान्यांना ते परवडणारे नसल्याचे मत श्रीपाल सहारे यांनी व्यक्त केले असून त्वरित पॅसेंजर चे प्रवाशी भाडे पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी रेल्वे प्रशासनाला केली आहे.”