आंबेठाण येथे सापडला दुर्मिळ शमेलिअन जातीचा सरडा …

पुणे वार्ता :- नेचर गार्ड ऑर्गनायझेशन च्या रेस्क्युअर शांताराम गाडे यांना आंबेठाण येथील शेतकरी संतोष सहादू दवणे यांनी घराशेजारी हिरव्या रंगाचा सरडा असल्याचे सांगितले.शांताराम गाडे यांनी त्वरित जाऊन ताब्यात घेतले .यावेळी नेचर गार्ड चे सल्लागार बापूसाहेब सोनवणे यांनी या सरड्याबाबत माहिती सांगितली.

याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या..घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिऒन [ Chameleon ] हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे . बरेचसे लोकं याचा उच्चार चमेलिओन असाही करतात. तर असा रंग बदलणारा सरडा आपण कधीतरी पाहिला असतो नाहितर त्याच्याबद्दल वाचलेलं असतं. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो. संपुर्ण भारतभर म्हणजे आसेतु हिमाचलपर्यन्त सरडे आढळतात. खास म्हणजे अगदी हिमालयाच्या पाच हजार मिटर उंचीपासुन ते राजस्थानच्या ५० अं. वाळवंटी तापमानातही सरडे आढळतात.
आपल्या परसदारात, शेतोडीत, जातायेता सहज दिसणार्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरड्याची फ़क्त एकच जात मिळते नी ती सुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच! घोयरा सरड्याचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासुनच सुरु होतं. खडबडीत दिसणारं ह्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नी “ज्युरासिक पार्क” पिक्चर मधल्या डायनोसार्स ची आठवण करुन देणारा याचा जबडा असं ’सुंदर ते ध्यान, राहे फ़क्त झाडावरीच’! याचा कारण म्हणजे घोयरा क्वचीतच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदुच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या ह्या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नी चक्क बिळ खोदुन त्यात अंडी घालते. आपण नेहेमी पहातो की आपल्या समोर दिसणारे सरडे अगदी तुरुतूरू पळत असतात. पण ह्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट घोयरा करतो. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहुल घेत विचार करुन हा सरडा प्रत्येक पाउल टाकतो. जमिनीवर जी गोष्ट, तीच गोष्ट झाडावरपण.अगदी कुशल कसरतपटुप्रमाणे हा लवचीक फ़ांद्यांवरही मस्त हालचाली करतो. ह्या हालचाली पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे जाणवते नी ती म्हणजे याचं स्वत:च्या शरीरातल्या प्रत्येक स्नायुवर कमालीचा ताबा असतो.


बरेचदा आपण जंगलात याला कित्येक तास एकाच ठिकाणी बसलेलं पाहू  शकतो . जे चपळपणे धावु शकत नाही ते स्वत:च वेगाने धावणारं भक्ष कसं पकडणार असा एक बेसिक प्रश्न कुणाच्याही मनात लगेच येऊ शकतो. निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काहीनाकाही तजवीज करुन ठेवलेली असते. घोयर्याची जिभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! त्याची जिभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला याचे डोळे निसर्गातलं दुसरं वैशिष्ट असतात. घोयर्याचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकुच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकु स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फ़िरु शकतात. म्हणजे ह्याच भक्ष दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलुन हळुच जबडा उघडुन थोडीच जिभ पुढे काढुन तयार रहतो.हे सगळं अगदी स्लो मोशन मधे सुरु असतं . मात्र नंतर एकाएकी आपल्यालच काय, त्या भक्षाला पण कळत नाही की भक्षाची जागा घोयर्याच्या तोंडात कशी? याची आठ ते नऊ ईंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचुन घेते. हेच ते घोयरा सरड्याच जगप्रसिद्ध जिभ फ़ेकणं नी परत आत घेणं! याच पद्धतीने हे महाराज मस्तपैकी किडे मकोडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे मटकवुन टाकतात.


आता रहाता राहिला प्रश्न त्या रंग बदलण्याचा! या साहेबांना काही धावता येत नाही. त्यामुळे स्वत:चा बचाव कसा करणार? मग अर्थातच सरुपता म्हणजेच कॆमोफ़्लेज [ camouflage ] होऊन सभोवतालच्या रंगानुरुप होणं! ह्याच्या शरिरातल्या रंगपेशी मेंदुकडुन आज्ञा आल्यावर शक्यतो हुबेहुब रंग धारण करायचा प्रयत्न करतात . जर ते शक्य होत नसेल नी शत्रु जवळच आला तर घोयरा स्वत:च अंग आणि गळा फ़ुगवुन आपण भयानक असल्याचा “ड्रामा” करतात. यांना दात असतातच. त्यामुळे घोयरा चावल्यास लहानशी जखम होते. अनेकजण याला पाळण्याचा प्रयत्न करतात. ते शक्यदेखील असते म्हणा. यांनासुधा इतर सरपटणार्या प्राण्यांप्रमाणेच जिवंत भक्ष लागतं.यांची “दूर द्रुष्टी” चांगली असते पण जवळच्या बाबतीत बर्यापैकी आनंदीआनंद असतो.
अनेक जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये नमकहराम माणसाला  उद्देशून  “तुम गिरगीट्की तरह अपना रंग बदल रहे हो” असा डायलॊग पुर्वी असायचा….. घोयरा बघितला की मला नेहेमी तेच आठवतं!

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!