प्रतिनिधी नीरज शेळके ठाणे:-
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही बालदिनाचे औचित्य साधून गंधार गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे दरवर्षी हा पुरस्कार सोहळा ठाण्यात होत असतो यंदा मात्र राजभवन येथे संपन्न झाला.बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारे सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांना यंदाचा गंधार गौरव तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना गंधार जीवन गौरव पुरस्कर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

रविवारी राजभवन येथे गंधार या नाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. ऍड. आशिष शेलार, आ. संजय केळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, गंधार नाट्य संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी गंधार युवा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

दिग्दर्शक जयंत पवार, अभिनेत्री, निवेदिका अनुश्री फडणीस, संगीत दिग्दर्शक ओंकार घैसास यांना गंधार युवा पुरस्कार देण्यात आला. सुरुवातीला गंधारच्या बाल कलाकारांनी कट्टी बट्टीचे सादरीकरण केले. पुरस्काराला उत्तर देताना परचुरे म्हणाले की, बालनाट्यासाठी हा पुरस्कार मला देण्यात आला याचा विशेष आनंद होत आहे. बालनाट्यापासून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली आणि त्या आठवणीसाठी हा पुरस्कार मी स्वीकारला आहे. १०० टक्के उपस्थितीत नाट्यगृह सुरू झाले की बालनाट्य नककुच बालप्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येऊ.

माझ्यामते बाल प्रेक्षक हा महत्त्वाचा प्रेक्षक असतो. त्यांना काहीही दाखवून चालत नाही. मोठ्या प्रेक्षकांसारखे ते व्यवहारी प्रेक्षक नसतात. ज्या क्षणी त्यांना नाटक आवडले नाही त्या क्षणी ते नाटकाकडे दुर्लक्ष करून आपापसात गमती जमती करतात. बाल प्रेक्षकांना रमवणे, त्यांचा विश्वास संपादन करणे नट म्हणून मिळालेली ती पावती असते आणि ती मला वर्षानुवर्षे मिळाली याचा मला विशेष आनंद होतो. आ. आशिष शेलार यांनी गंधारचे कौतुक करीत प्रा.मंदार टिल्लू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. संजय केळकर तर निवेदन धनश्री प्रधान – दामले यांनी केले.

