आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम
राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहाचा समारोप
प्रतिनिधी ठाणे नीरज शेळके:-
ठाणे दि.१४: आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने ९ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत विधी सप्ताह साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये कायदेविषयक जागृती होण्यासाठी रविवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या हस्ते या प्रभात फेरीचे उद्घाटन करण्यात आले.

ठाणे सत्र न्यायालयाच्या आवारातून मासुंदा तलावाभवती पूर्ण फेरी मारून या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.मंगेश देशपांडे, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.वी. वाय.जाधव, न्या. एस. के.फोकमारे, न्या. के.अ. बेनवडे, न्या.जे.आर.मुल्लानी तसेच आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विधी विषयक मोफत सल्ले देण्यात येतात. अनेक नागरिकांना या सेवेबाबत माहिती नसते. नागरिकांना या सेवांची माहिती व्हावी या उद्देशाने जनजागृती फेरी काढण्यात आली.
