मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरण कामासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडून रु.५कोटी मंजूर…
ठाणे प्रतिनिधी नीरज शेळके :-
कल्याणलोकसभा मतदारसंघाला भारतीय स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांचा वारसा मिळाला आहे. यामध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अंबरनाथ येथील १००० वर्षांचा वारसा असलेले प्राचीन शिवमंदिर तसेच प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेले खिडकाळीशिवमंदिर असून या अनमोल सांस्कृतिक वारसांचे जतन करुन त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी आग्रही राहून सातत्याने पाठपुरावा करत आहे. याचेच फलित म्हणून यापूर्वी अंबरनाथ येथील शिवमंदिर आणि परिसराचे सुशोभिकरण करण्याकरिता राज्य सरकारकडून रु.४३ कोटीं एवढा भरघोस निधी मंजूर करुन घेतला आणि या वास्तूच्या सुशोभिकरणाच्या कामाला गती देत आहे. लवकरच पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आणि देशातील अग्रगण्य आरेखकांच्या मदतीने शिवमंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे.

यासोबतच असाच एका प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेले शिळफाट्यालगतच्या देसाईगाव येथील खिडकाळी शिवमंदिर असून या शिवमंदिर आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी प्रयत्नशील राहिल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून रु.५ कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

खिडकाळी येथील हे शिवलिंग स्वयंभू आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी येत असतात. तसेच महाशिवरात्री उत्सवाच्या दरम्यान काशी, अयोध्या, उत्तराखंड येथून साधू संत येथे वास्तव्यास येतात. स्वामीशिवानंदमहाराज यांनी १९३४ मध्ये येथे समाधी घेतली असून खिडकाळी मंदिर हे भाविकांसाठी तीर्थस्थान आहे. तसेच खिडकाळी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी सदर मंदिरांच्या ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीसाठी प्रयत्नशील राहून राज्याचे पर्यटन मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याकडे श्री. श्रीकांत शिंदे यांनी मागणी केली आहे.

या शिवमंदिराचा तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास व्हावा आणि भविष्यात एक उत्तम तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला यावे त्यामुळे यासाठी शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन संबंधी विविध योजनांमार्फत भरघोस निधी मिळावा याकरिता राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडेही मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून नगरविकास विभागातर्फे खिडकाळी शिवमंदिराच्या आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे खिडकाळी येथील शिवमंदिर आणि परिसराचे रूप पालटणार आहे.

या सुशोभिकरणामुळे हे मंदिर देशभरातील पर्यटक तसेच भाविकांसाठी महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनेल आणि यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच येथील स्थानिक नागरिकांना रोजगार ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल, असा विश्वास आहे.



