सोलापूर वार्ता – : कोरोना पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध कायम असल्याने यंदाही पैगंबर जयंती निमित्ताने कोणतीही मिरवणूक निघणार नाही, अशी माहिती जशने ईद ए मिलादून्नबी जुलूस कमिटी सोलापुरचे अध्यक्ष यु.एन. बेरिया यांनी आज दिली.
ते म्हणाले मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यात आली होती ती मिळालेली नाही. यामुळे यंदाही मिरवणूक न काढता विविध सामाजिक उपक्रमाद्वारे पैगंबर जयंती साजरी करावी असे ठरले आहे. यंदा मंगळवार 19 ऑक्टोंबर रोजी पैगंबर जयंती साजरी करण्यात येणार आहे. विविध मंडळांनी या निमित्तानं गोरगरिबांना, गरजूंना अन्नधान्य तसेच शैक्षणिक मदत करावी. आपापल्या भागात सजावट तसेच शैक्षणिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रम घ्यावेत. कोरोना संपल्यावर याचा बक्षीस समारंभ केला जाईल. पैगंबर जयंती आनंदमय वातावरणात परंतु शांततेत साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेस जुलूस कमिटी सोलापूरचे सरचिटणीस बशीर शेख उपस्थित होते.
————————
पैगंबर जयंती निमित्त विजापूर वेस परिसरात विविध कार्यक्रम
सोलापूर- पैगंबर जयंती निमित्ताने ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन ,विजापूर वेस युवक संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हे कार्यक्रम मोफत किंवा अत्यल्प दरामध्ये करण्यात येणार आहेत ही माहिती आज पत्रकार परिषदेत अशपाक इस्माईल बागवान यांनी दिली.
17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोहम्मदिया मज्जीद नजीक दवाखान्यात खतना शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 18 रोजी आरोग्य शिबिर 19 रोजी मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर असे कार्यक्रम आहेत .याच बरोबर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या पुढाकारातून राणी लक्ष्मी मार्केट ते विजापूर वेस या रस्त्याचे नामकरण इस्माईल बागवान मार्ग असे करण्यात आले आहे. त्याच्या नामफलकाचे अनावरण मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता राणी लक्ष्मी मार्केट येथे करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत शहानवाज कुरेशी, नसीमा कुरेशी, आरिफ शेख, रिजवान नाईकवाडी आदी उपस्थित होते.