मुंबई वार्ता :- ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, कोल्हापूर, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली .
अजित पवार घोटाळा… ९ दिवसांचे आयकर छापे… मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर… ७० ठिकाणी छापे… १००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने….कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी… १८४ कोटींचे बेनामी संशयास्पद व्यवहार… या शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले. या ट्वीटमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स विभागाने जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या साखर कारखान्यांशी संबंधित व्यवहारांची चौकशी सुरू केली. अनेक धाडी टाकल्या. ज्या कारखान्यांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे त्या कारखान्यांच्या व्यवस्थापनात अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. मुंबईत दोन बड्या रिअल इस्टेट समुहांची चौकशी सुरू आहे. या कारवाई संदर्भात इन्कम टॅक्स विभागाने प्रसिद्धीपत्रक काढले. यात धाडी टाकण्याआधी सलग काही महिने तयारी सुरू होती. ठोस माहितीआधारे कारवाई केली, असे सांगण्यात आले. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले.
ट्वीटच्या माध्यमातून सोमय्या यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. कारवाई संदर्भात माहिती देण्यासाठी आयकर विभागाने काढलेले प्रसिद्धीपत्रक सोमय्या यांनी ट्वीट केले. यात १८४ कोटी रुपयांच्या व्यवहारांविषयी संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बोगस शेअर प्रिमिअम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी असमाधानकारक अॅडव्हान्स आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यासोबत सौदे करून हे पैसे मिळवण्यात आले आणि एका प्रभावशाली कुटुंबातील सदस्यांचा त्यात समावेश असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. साखर कारखान्यांशी संबंधित व्यवहारात झालेल्या आर्थिक लाभाचा वापर खासगी मालमत्तेच्या खरेदीसाठी झाल्याचेही प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.