स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने पटकाविला प्रथम पुरस्कार
वाशिम:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ कार्यालय पुरस्कार वितरण आणि स्वच्छतेचे नायक गौरव समारंभ जिल्हा परिषदेच्या सभागृहात (दि. 11) थाटात संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले, तसेच जिल्हा परिषदेत सफाई कामगार म्हणुन कार्यरत असलेल्या एकुण 9 जणांचा स्वच्छतेचे नायक हा सन्मान व देऊन गौरव करण्यात आला.
प्रतिनिधी फुलचंद भगत :-

जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले, ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनोद वानखडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, लेखाधिकारी प्रशांत जोशी, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, ग्रामिण पाणी पुरवठा विगाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची मंचावर उपस्थिती होती.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये स्वच्छ कार्यालय ही पंचायत राज त्रिस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ग्राम पंचायत स्तरावर पहिला पुरस्कार मालेगाव तालुक्यातील बोरगाव या ग्राम पंचायतीने पटकाविला होता. रिसोड तालुक्यातील हराळ व वाशिम तालुक्यातील ब्रम्हा या ग्राम पंचायतींना व्दितिय पुरस्कार विभागुन देण्यात आला. मानोरा तालुक्यातील कारखेडा आणि कारंजा तालुक्यातील धामणी खडी या दोन ग्राम पंचायतींना सुध्दा तृतिय पुरस्कार विभागुन देण्यात आला. तसेच मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ या ग्राम पंचायतीला प्रोत्साहनपर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
