दोन दिवसांत 29 हजार 352 नागरिकांचे लसीकरण.
प्रतिनिधी नीरज शेळके ठाणे :-
ठाणे, ता. 11 : हर घर दस्तक या मोहिमेतंर्गत आज ठाणे पूर्वे आनंदनगर येथील केदारेश्वरनगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधून ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही अशा नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करुन त्यांना लसीकरणासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रवृत्त केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवारी सायंकाळपर्यत एकूण 14 हजार 100 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

9 नोव्हेंबरपासून या ही व्यापक मोहिम हाती घेण्यात आली असून संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात ही मोहिम सुरू आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी 14,752 नागरिकांचे तर दुसऱ्या दिवशी 14,600 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून हि मोहिम सुरू झाल्यापासून आतापर्यत एकूण 29,352 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

170 पथकाच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या घरोघरी भेटी दिल्या जात आहेत. या भेटीदरम्यान महापालिकेचे आरोग्य पथक हे नागरिकांनी लस घेतलेल्याचे प्रमाणपत्राची तपासणी करीत आहे. या तपासणीत ज्या नागरिकांनी लसीकरण करुन घेतले नाही त्या नागरिकांचे तात्काळ लसीकरण केले जात आहे. या मोहिमेत स्वत: महापौर नरेश म्हस्के हे आरोग्यपथकांसमवेत विविध परिसरांना भेटी देत आहेत.
