प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील गावांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी गावांतील नागरिकांनी प्रवेश बंदीला सुरवात केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशा मजकुराचे फलक गावांमध्ये लावण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी गेल्या 2 महिन्यात अनेक भावांनी आत्महत्या केली आहे. त्यातच जालना येथील मराठा आंदोलन कर्त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील अनेक गावांनी गावबंद ठेऊन व रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला होता.मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न सरकारपुढे मांडला असुन आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हटणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी शांततेत 17 दिवस उपोषण केले होते.

सरकारने आरक्षणासाठी दिलेली वेळ व दिवस आता निघून चालले आहेत तरी अजून समाजाला आरक्षण दिले गेले नाही. यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला असुन मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठींबा व आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील गावांमध्ये लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.जो समाजाला मानत नाही, त्यांना आम्ही मानत नाही असा इशारा फलकातून देण्यात आला आहे.तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत कोणीही गावात येऊ नये असा आक्रमक पवित्रा आता गावांतील मराठा समाजातील नागरिकांनी घेतला आहे.

याची सुरवात खेड तालुक्यातील बहिरवाडी, व भोसे या गावांपासून झाली असुन या गावांमध्ये प्रवेशबंदीला सुरवात झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर याचे परिणाम येत्या निवडणुकीत राजकीय मंडळींना भोगावे लागणार आहे.