ब्युरो रिपोर्ट स्वराज्य वार्ता
ओडिसातल्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस,दुरांतो एक्सप्रेसचा व मालगाडी या 3 रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन खाली घसरले.व पाठीमागून येणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसला धडकल्याने मोठा भीषण अपघात झाला आहे.यात आतापर्यंत 288 च्या वर प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच 900 प्रवासी जखमी झाले आहेत.

कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकल्यानंतर एक्स्प्रेसचे जवळपास 17-18 डबे रुळावरुन खाली घसरले. यात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.अजूनही बचाव कार्य सुरू असुन जखमींना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा दुरांतो एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातातला मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे. रेल्वे रुळांवर तीन गाड्यांचे उलटलेले डबे, मोडलेले इलेक्ट्रीक खांब असं भयानक दृश्य आहे. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना 10 लाख रुपये देण्यात येणार असून गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे.घटनास्थळी मा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली असुन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.