प्रतिनिधी कुणाल शिंदे
चाकण ( पुणे ) : चाकण एमआयडीसीतील कुरुळी ( ता. खेड ) येथे २६३ वा सतीआई माता भंडारा महोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र जगदाळे व सहकारी यांनी मर्दानी आखाडा म्हणजे शिवकालीन युद्ध कला शस्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर पानिपतवीर सुभानरावराजे व सतीमाता सुलोचनादेवी यांना क्षत्रिय मानवंदना दिली.

१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत रणसंग्रामामध्ये पुणे जिल्ह्यातील कुरुळी येथील सुभेदार सुभानरावजी श्रीहरीराव गायकवाड सरकार यांना वीरगती (हौतात्म्य) मिळाली. अशा क्षत्रिय विराच्या पत्नी सुलोचनादेवी यांचे इच्छेनुसार चैत्र शुद्ध दशमीला कुरुळी गावात सध्याच्या सतीआई मंदिराच्या जागेत सती विधीने त्यांना अग्नी दिला जातो, असा इतिहास आहे. अशाप्रकारे त्यांनी स्वयंप्रेरणेने क्षत्रिय अमरत्व प्राप्त केले. अशा वैभवशाली ऐतिहासिक मातेच्या पुण्यतिथी व पुण्यस्मरणार्थ तेव्हापासुन आजपर्यंत दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला दिवसभर विधीवत धार्मिक पुजा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शस्त्राचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. या परंपरेला २६२ वर्षे पुर्ण झाली आहेत.
बडोदा संस्थानचे गायकवाड घराण्याचा इतिहास, दावडी निमगावचे श्रीमंत गायकवाड सरकार यांचे शिवकालीन वैभव तसेच कुरुळीतील पानिपतवीर सुभानरावराजे यांची शौर्यगाथा व त्यांची पत्नी सुलोचनादेवी (सतीमाता) ही सती कशी गेली ?याची माहिती त्यांनी दिली. गायकवाड यांनी छत्रपती शाहु महाराजांना दिलेली मौल्यवान साथ असे विविधांगी गायकवाडांचे घराण्यासहीत वैभव व इतर कर्तृत्वाचे, इतिहासाचे दस्तऐवजाचे दाखले देऊन कुरुळीतील शिवतिर्थावरील सभेला संबोधित केले.
यावेळी श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान शाखा नं. ५ कुरुळी या शाखेचे सर्व वंशजांनी साडेचार हजार भाविक भक्तांना पारंपरिक पंगतीने अन्नप्रसाद वाटप केला. अजित गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कुरुळी येथील समस्त गायकवाड सरकार परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.