प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- रासे गावात शेजारच्याचा बांध कोरून फूटभर आपली जमीन वाढवण्याचे काम काही शेतकरी करण्या पटाईत आहेत. परंतु गावच्या विकासासाठी आपली जमीन दान करणारे दानशुर व्यक्ती आपल्याला मोजकेच पाहायला मिळतील. रासे गावातील मुंगसे व डावरे परीवाराने देखील आपली स्वतःची 2 गुंठे जमीन गावच्या जलजीवन योजनेला व स्मशानभूमीसाठी दान करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. गावासाठी मोलाचं काम करणारे मुंगसे व डावरे परिवाराचा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामपंचायतीने थाटात सत्कार केला.त्यामुळे या परिवाराचे सर्व ग्रामस्थांमधुन कौतुक होत आहे.

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत “हर घर नळ, हर घर जल,” योजना प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावामध्ये यशस्वीपणे राबवा अशा सुचना केंद शासनाने दिल्या आहेत. या योजनेसाठी रासे गावाला 3 कोटी 89 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.यासाठी साठवण टाकीचे बांधकाम करण्यासाठी जागेची कमतरता ग्रामपंचायतीला भासत होती. अखेर या सामाजिक कार्याला गावातील ग्रामस्थ माजी सरपंच श्री नामदेव गेनु मुंगसे,,श्री सोपान भागूजी मुंगसे, श्री निवृत्ती रामभाऊ मुंगसे,व यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी स्वतःची 2 गुंठे जागा गावासाठी दान करून बक्षीस पत्र ग्रामपंचायतीला करून दिले.

तसेच गावातील श्रीमती शारदा वसंत डावरे यांनी पतीच्या स्मरणार्थ स्मशानभूमीसाठी 1 गुंठा जागा गावासाठी दान करण्यात आली. यांचा देखील सत्कार यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ मंगल खरपुडे,सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला.

या गावच्या सामाजिक कार्यासाठी दानशूर ग्रामस्थांचा आज प्रजासत्ताकदिनी जाहीर सत्कार ग्रामपंचायतकडुन ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे साठवण टाकीचा जागेचा प्रश्न सुटल्याने योजनेच्या कामाला गती येऊन ग्रामस्थांना लवकरच घरोघरी नळाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

अनेक गावांत शेतकऱ्यांचा रस्ता अडवणारे, शेजारील शेतकऱ्यांचा बांध कोरणारे,गावात विकास कामात अडथळा आणणारे,स्मशानभूमीला जागा न देणारे आपण पाहत असतो.. पण अस म्हणतात ना “माणुस मरणानंतर सोबत काही घेऊन जात नाही, पण गावासाठी केलेलं मोलाचं दान कोणी विसरत नाही” असे सामाजिक कार्यात आपला मोठेपणा जपणारे मुंगसे व डावरे परिवार आपल्या आठवणी रासेकर ग्रामस्थांच्या मनात ठेवून जाणार हे नक्की..