चाकण वार्ता प्रतिनिधी
चाकण, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे खळबळजनक विधान केले. या त्यांच्या विधानाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले असून चाकण शहरात देखील भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाकडून आज दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी जाहिर निषेध करण्यात आला. चाकणमधील जय महाराष्ट्र चौकात संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत अजित पवार यांचा धिक्कार केला.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीवर माथा टेकवून माफी मागावी अशी मागणी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव यांनी केली. भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे यांनी कधी शरद पवार तर कधी अजित पवार हे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विषयी विपर्यास निर्माण करणारी विधाने करत असतात असे मत मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आर्यकर्ते शौर्य दिनाच्या काळातच कधी गावात बंद पाळतात तर कधी अशांतता माजेल असे विधान करतात असे विचार भाजपा चाकण शहर प्रभारी अध्यक्ष ॲड प्रितम शिंदे यांनी मांडले. तर जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी यांनी अजित पवार यांनी माफी नाही मागितली तर शिवशंभू प्रेमी आणखी तिव्र आंदोलन करतील असे सांगितले.
चाकण पोलीस अधिकारी यांना निषेधाचे व गुन्हा नोंद करण्याबाबतचे निवेदन युवा मोर्चा चाकण शहर व भाजप चाकण शहर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
