प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणें :- खेड पंचायत समितीची बहुप्रतिकक्षेत असलेली इमारत अखेर मंजुर झाली आहे. इमारतीच्या बांधकामास रु 13.90 कोटींच्या प्रस्तावास राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच मा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचे भुमीपूजन थाटामाटात संपन्न होणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देत खास स्व.माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा शासन निर्णय जाहीर करत भाऊंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तत्कालीन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या प्रयत्नांमुळे जानेवारी २०१९मध्ये ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी पाच कोटी रकमेच्या खेड पंचायत समिती इमारतीच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर कामाची निविदा प्रसिद्ध होऊन पात्र ठेकेदाराला जिल्हा परिषदेकडून कार्यारंभ आदेश देत आढळराव पाटील, सुरेश गोरे व खेड तालुक्यातील शिवसैनिकांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते आमदार झाल्यावर त्यांनी सदर जागेवर इमारत बांधण्यास विरोध केल्यानंतर शिवसेना विरुद्ध आमदार मोहिते असा तीव्र संघर्ष होऊन हे काम ठप्प झाले होते.


मा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने शिरूर लोकसभेतील महत्त्वाची कामे मार्गी लागावी यासाठी मंत्रालयात विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीतच मुख्यमंत्री शिंदे यांनी मूळ मंजूर झालेल्या जागेवरच पंचायत समिती इमारतीचे काम हाती घेण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देत यासाठी अधिकचा निधी आपण देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर आढळराव पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात समक्ष भेट घेऊन खेड तालुक्याच्या अस्मितेचा विषय असलेल्या या कामास तात्काळ निधी उपलब्ध करून मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी केली. त्यास यश येऊन खेड पंचायत समिती इमारतीच्या १३.९० कोटी रकमेच्या कामास मंजुरीचा शासन निर्णय आज ग्रामीण विकास विभागाने पारित केला आहे.

सुमारे ३१ हजार स्क्वेअर फुट बांधकाम असलेल्या या अद्यावत खेड पंचायत समितीच्या दुमजली इमारतीमध्ये तळमजल्यावर प्रशस्त वाहन पार्किंग सुविधा व सुरक्षा व्यवस्था असेल. पहिल्या मजल्यावर गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांचे प्रशस्त कार्यालय असेल. यासह व्यवस्थापन व पंचायत विभाग, अर्थ, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, पशुवैद्यक विभाग, मनरेगा, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, छोटे पाटबंधारे विभाग, डीआरडीओ व संगणक कक्ष आदि विभागांची स्वतंत्र सुसज्ज कार्यालये इमारतीत असतील. याशिवाय सुमारे २५० आसन क्षमतेच्या बहुउद्देशीय सभागृहासह दोन स्वतंत्र सार्वजनिक शौचालये देखील इमारतीत असणार आहेत.