चाकण : रक्षाबंधनच्या दिवशीच चाकण परिसरातील मेदणकरवाडी गावातील ४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या मुलीच्या आई नेहा सत्यद्र कुमार ठाकूर (वय -२७)हल्ली मुक्काम भागवत वस्ती, मेदणकरवाडी, मूळ गाव -भोजापूर, ता. भैरिया, जि. बलिया राज्य -उत्तर प्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास दोघी बहिणी घरात झोपलेल्या असताना त्यातील रिशू (वय -४ वर्षे ४ महिने) नामक मुलगी कुणाला काहीही न सांगत दुपारी २ च्या सुमारास घराच्या बाहेर पडली. त्यानंतर तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळुन नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
त्यानंतर दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांना एका मुलीचा विवस्त्र असेलेला मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सकाळी ठिक ९: १५ वाजताच्या दरम्यान मिळून आलेल्या मृतदेहाबद्दल माहिती चाकण पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर तात्काळ चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह शिवविच्छेदन करण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला..
या प्रकरणा संदर्भात चाकण पोलीस ठाण्यात भां. द. वि नुसार ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगारे, पोलीस निरीक्षक देवडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.