बीड वार्ता:- बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू आहे.या दसरा मेळाव्याच्या सुरुवातीला भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. हा मेळावा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाहीये असं सर्वप्रथम खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
दसरा मेळाव्यादरम्यान बोलताना खा. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही, मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहचतो. हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही. हा कोणत्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाही. हा मेळावा आहे भगवानबाबांच्या भक्तांचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा. असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. आज या मेळाव्याला येत असताना मागील काही दिवसांमध्ये एवढी अतिवृष्टी झाली की लोकांच्या मनात थोडी शंका होती, की मेळावा होईल का नाही? किती मोठा होईल? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की, जरा डोळे उघडून हा उसळलेला जनसमुदाय पाहा. हा भगवानबाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्कारांचं प्रतीक आहे.
आज विजयादशमीचा दिवस आहे, नवरात्रीचा सण हा आपण देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीची अनेक रूपं बघता येतात, देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रूप आपण बघतो.
पंकजाताई पालकमंत्री असताना आपण रूप बघितलेलं आहे. पण नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली.
जेव्हा समाजामध्ये अराजकता पसरते, जेव्हा समाजात विषमता पसरते. जेव्हा समाजात अन्याय पसरतो.
तेव्हा तीच देवी दुर्गेचा अन्याय घेऊन त्या अन्यायाला संपवल्याशिवाय राहत नाही. याचं देखील हा विजयादशमीचा सण हा प्रतीक आहे.
म्हणून आज मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देते. असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
पुढे प्रीतम मुंडे म्हणाल्या की, काल मला माध्यमांमधील काही लोकांनी विचारलं, की मुंडे परिवारासाठी हा मेळावा फार महत्वाचा आहे.
मी म्हणाले हो मुंडे परिवारासाठी हा मेळावा महत्वाचा आहे, कारण गोपीनाथ मुंडे परिवार म्हणजे पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे नाही.
तर इथे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय, मंचावरील सगळी लोकं जशी आमच्या परिवाराचा भाग आहेत.
तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या उन्हात येऊन सकाळपासून थांबलेले तुम्ही सर्वजण देखील आमच्या परिवाराचा भाग आहात.
म्हणून मुंडे परिवारासाठी हा दसरा मेळावा अतिशय महत्वाचा आणि लक्षवेधी ठरतो.
आपला मेळावा हा कोणत्या पक्षाचा मेळावा नाही, हा कोणता राजकीय मेळावा नाही.
हा मेळावा हा त्या प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं आहे.