सिंधुदुर्ग वार्ता -: जिल्ह्यातील कुडाळा हुरमळा गावात शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निलेश राणेंच्या उपस्थितीत नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. हा शिवसेनेला मोठा धक्का समजला जात आहे.यावेळी निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर टीका केली.
यावेळी निलेश राणे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लूटायचे मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघालेत. ते मुख्यमंत्र्यांसारखं कधीच बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांची क्वॉलिटी त्यांच्यामधे नाही ते वायफळ बडबड करतात त्यांच्या विचारांची मर्यादाचं तेवढी आहे. त्यामुळे ते दुसरं काही बोलू शकत नाहीत. अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना निलेश राणेंनी धक्का दिला आहे. हुमरमळा गावातील युवा सेनेचे शाखा प्रमुख विरेंद्र नाईक यांच्या नेतृत्वात अनेक सेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांनी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना भाजपात घेण्याचा सपाटाच लावला आहे. यापुढे असे अनेक धक्के शिवसेनेला बसतील असे निलेश राणे यावेळी म्हणाले.
निलेश राणेंची कुडाळ विधानसभेची तयारी?
कुडाळ विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून तयारी सुरु करण्यात आल्याचं कळतंय. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं गेल्या काही दिवासांपासून निलेश राणेंनी शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेतून भाजमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या सदस्यांनी आपण इथल्या आमदारांवर नाराज असल्याने आपण शिवसेना सोडल्याचं सष्ट केलं होतं.