फत्तेपूर बाबांवर भाविकांची अफाट श्रद्धा
दिवाळीच्या दुसऱ्यायेरड (खरबी) येथील दगडाच्या मूर्तीत अवतरलेले फत्तेपूर बाबा दिवशी यात्रा
फत्तेपुर बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
चांदूर रेल्वे प्रतिनिधी सुभाष कोटेचा :-
चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (खरबी) या ठिकाणी फत्तेपूर बाबांचे एक छोटेसे मंदीर आहे. पुरातन काळापूर्वी याच गावात दगडाच्या मूर्तीमध्ये फत्तेपुर बाबा अवतरलेले असून फत्तेपूर बाबांच्या मूर्तीची स्थापना हि श्रीमंत रघुजी राजे भोसले यांच्या पुरातन काळातील आहे. हि फत्तेपूर बाबांची मुर्ती कडुनिंबाच्या गोल आकाराच्या झाडाखाली असून हे निंबाचे झाड बाराही महिने हिरवेगारच असते हे एक विशेष आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी याठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा भरली होती.

श्रीमंत रघुजी राजे भोसले हे आपले सैन्य घेऊन जुन्या काळातील नागपूर- सातारा पुणे मार्गावर असलेल्या खरबी मांडवगड या ठिकाणी फत्तेपूर बाबांची मूर्ती असलेल्या निंबाच्या झाडाखाली छावणीचे ठिकाण म्हणून मुक्कामी राहत होते. मुक्कामी राहत असतांना त्यांच्या छावणीतील घोडे आजारी पडल्यानंतर फत्तेपूर बाबांच्या नावाने अंगारा लावून त्यांच्या घोड्यांना आराम पडत होता.

त्या दिवसापासून फत्तेपूर बाबांवर भाविकांची व या परिसरातील लोकांची अफाट श्रद्धा आहे. येरड खरबी येथे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बलिप्रतिपदेला या ठिकाणी यात्रा भरत असून प्रसिद्ध जनावरांचा देव म्हणून श्रद्धा असलेल्या फत्तेपुर बाबांच्या दर्शनासाठी या परिसरातील शेतकरी शेतमजूर आपल्या गाई, म्हशी,बैल, बकरी इत्यादी हजारो जनावरे व काही हवसे गवसे नवसे आपल्या गाईंना सजवून गौळणींना वाजत गाजत घेऊन फत्तेपूर बाबांच्या दर्शनासाठी घेऊन येतात. हीच प्रथा शुक्रवारी पहावयास मिळाली.
