स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
आज पालखीचा पुण्यात पहिला मुक्काम

पुणे :- दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी जाणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज आळंदीतुन प्रस्थान झाले. यावेळी आळंदीकर, पंचक्रोशीतील गावातील नागरिक,राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेले वारकरी आपल्या माऊलींना निरोप देयला आलेले पाहायला मिळाले..आजचा पालखीचा पहिला मुक्काम हा पुण्यात असणार आहे.,

“माऊली माऊली रूप तुझे”
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या दिंड्या, वारकरी ,मोठ्या प्रमाणात 5 दिवसांपासून अलंकापुरीत दाखल झाले होते. आज सकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींची पादुकांची आरती झाल्यावर पालखीचे देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. त्यानंतर माऊलींच्या रथात पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. रंगीबेरंगी व आकर्षक फुलांनी माऊलींचा रथ यावेळी सजवण्यात आला होता. सकाळपासून टाळ, मृदुंगाच्या तालात व भक्तिमय वातावरणात माऊलींच्या जयघोषात आसमंत दुमदुमून निघाला होता. माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी पालखी मार्गावर जागोजागी सुबक रांगोळ्याच्या पायघड्या, व सुंदर फुलांची रांगोळी महिला भगिनींनी यावेळी काढलेली होती.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मुख्य भुमिका बजावणारे प्रशासन पोलीस, आरोग्य विभाग, नगरपरिषद,महावितरण यावेळी मोठी जय्यत तयारी केली होती. माऊलींच्या प्रस्थानावेळी प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत, तुळशी,पताका डोक्यावर घेत आनंद लुटला.यावेळी अधिकारी देखील माऊलींच्या हरिनामांत तल्लीन झालेले पाहायला मिळाले. यावेळी पोलीस प्रशासनातील महिलांनी, मुलींनी देखील कर्तव्य बजावत असताना फुगड्या,खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

आज माऊलींच्या रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा पहिला मुक्काम हा पुण्यात असणार आहे. पुणे शहरात प्रवेश करताना यावेळी माऊलींच्या पुणेकरांनी पालखीचे जंगी स्वागत केले.