ठाणे वार्ता -: मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये.
शांती नायडू असं मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेचं नाव आहे. शांती या आपल्या मैत्रिणीसोबत सकाळी सातच्या सुमारास भेंडीपाडा परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचं मंगळसूत्र खेचलं आणि तिथून पळून गेले.
घटना सीसीटीव्हीत कैद
ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसात चैन स्नॅचिंगचे प्रकार वाढले असून त्यामुळे पोलिसांनी अधिक प्रभावीपणे नाकाबंदी आणि गस्त वाढवण्याची गरज निर्माण झालीये.
लाखो रुपयांचे दागिने चोरीचा उलगडा
नवी मुंबई पोलिसांना दोन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे. या चोरट्यांनी तब्बल 18 गुन्हे केल्याचा आरोप पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचे सोने जप्त केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करुन सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे आरोपींना बेड्या ठोकल्याने तब्बल 18 चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 4 लाख 35 हजारांचे सोने तसेच 1 लाख किंमतीची दुचाकी असे एकूण 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. तर दुसऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपींचा छडा कसा लावला?
नवी मुंबई पोलीस सोनसाखळी चोरीच्या घटनांचा उलगडा करत होते. त्यासाठी ते शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत होते. यावेळी एकाच आरोपीने तब्बल 6 गुन्हे केल्याचं कॅमेऱ्यात निषपन्न झालं. पोलिसांनी आरोपीचा छळा लावण्यासाठी तापासाला सुरुवात केली. यावेळी आरोपी हा गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.