नाशिक वार्ता :- सिन्नरमधल्या सरदवाडीत एक धक्कादायक पद्धतीने केलेली चोरी उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी चक्क गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून एटीएममधून रक्कम पळवली आहे. चोरट्यांनी एकूण 22 लाख 71 हजार 300 रुपयांची चोरी केल्याची माहिती मिळाली आहे.
सरदवाडी येथे हॉटेल अंजिक्यताराजवळ ॲक्सिस बँकेचं एटीएम आहे. चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री या एटीएममध्ये प्रवेश केला. शटर बंद करून घेत त्यांनी सीसीटीव्हीची वायर तोडून टाकली. त्यानंतर सोबत आणलेल्या गॅस कटरने त्यांनी एटीएमचे तुकडे केले आणि एटीएममधील रक्कम पळवून नेली. त्यानंतर त्यांनी एटीएमचं शटर पुन्हा लावून घेतलं.
चोरट्यांनी एटीएमचं शटर पुन्हा लावून घेतल्याने चोरी लवकर उघडकीस आली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. एटीएम फोडून चोरी झाल्याचं पोलिसांना कळवताच पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले.
पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. सीसीटीव्हीवर उमटलेल्या ठशांच्या साहाय्याने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय एटीएम बाहेर सुरक्षारक्षक नेमलेला असतानाही चोरीच्या वेळी सुरक्षारक्षक कुठे होता? याचीही चौकशी पोलिस करणार आहेत.