Post Views: 406
११ एप्रिलपर्यंत कलम ३६ अन्वये आदेश
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-जिल्ह्यातील पोलिस स्टेशन मानोरा अंतर्गत येणाऱ्या पोहरादेवी येथे ११ एप्रिल पर्यंत राम नवमी यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
हा यात्रोत्सव शांततेत पार पडावा याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये पोहरादेवी यात्रा बंदोबस्तातील सर्व फौजदार व त्यांच्यापेक्षा वरील दर्जाचे अधिकाऱ्यांना ७ ते ११ एप्रिलपर्यंत जादा अधिकार प्रदान केले आहे.
पोहरादेवी येथे यात्रा उत्सवादरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकानी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणुक कशी असावी याविषयी निर्देश देणे, मिरवणुका कोणत्या मार्गांनी व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नये असे मार्ग व अशा वेळा विहित करणे.सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे.
अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटीवर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धूण्याचे, उतरण्याचे ठिकागी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे,कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल,ताशे,व इतर कर्कश वाद्य वाजविणे इत्यादी बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे,कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक करमणूकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम ३३,३५,३७ ते ४०,४२,४३ व ४५ अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पूष्टी देणारे योग्य आदेश देणे, इ. अधिकारांचा समावेश आहे.या आदेशाचे कोणीही कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.