जबरी चोरी करणारे परराज्यातील अट्टल गुन्हेगारांच्या शिरूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे वार्ता :- न्हावरे (ता. शिरूर) येथे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांला भर रस्त्यावर लुटण्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील परराज्यातील जबरी चोरी करणारे अट्टल गुन्हेगारांना अवघ्या पाच दिवसात जेरबंद करण्यात शिरुर पोलिसांना यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी कि, दि 25 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब बबनराव खेडकर रा. शिंदोडी ता. शिरूर जि. पूणे हे त्यांचे नातेवाईकांसह बँक ऑफ इंडीया न्हावरे या शाखेत ७ लाख १३ हजार रुपये कर्जाची रक्कम भरणेसाठी पिशवीत घेवून न्हावरे ते चौफुला डांबरी रोडने बँकेकडे पायी जात असताना न्हावरे गावातून पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन दोन अज्ञात इसमाने तक्रारदाराच्या हातातील एकूण 7, 13,000 रू ची पैशाची पिशवी जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला होता परंतु ती पिशवी फाटल्याने ७ लाख १३ हजार रुपये पैकी ७० हजार रुपये सदर मोटार सायकलवरील चोरांच्या हाती लागले होते व उर्वरीत रक्कम रस्त्यावर पडली होती. सदर ७० हजार रुपये रोख रक्कम चोरून ते दोन्ही अज्ञात इसम मोटारसायकलवरून चौफुलाचे दिशेने पळून गेले अशा आशयाची तक्रारदाराने तक्रार दिल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्ह्याचा तपास करणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक शिरूर यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी तात्काळ दोन स्वतंत्र तपास पथके तयार करून एक पथक दौंड भागात व एक पथक पाटस कुरकुंभ भागात तपास करणेकामी रवाना करण्यात आले होते. तपास सुरू असताना दोन्ही पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार सदर दोघे आरोपी हे गुन्हा करून दौंड भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे तपास पथकाने दौंड भागात सापळा रचून त्यांना गोवा गल्लीचे अलिकडे, सिध्दटेक रोडवर, दौण्ड येथे पाठलाग करून मोठ्या शिताफिने पकडले.

त्यांना विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. राकेश येशु गुडेट्टी (वय 26 वर्षे रा. कपराळ टिप्पा ता-कावळी जि-नेल्लोर राज्य-आंध्रप्रदेश), सॅम्युअलराज तिमोती गोगुला (वय 27 वर्षे रा. ओझीकुपम ता. कावेली जि. चित्तुर राज्य आंध्रप्रदेश, सध्या दोघे रा. दौड ता. दौड जि. पुणे) अशी सदर घटनेतील आरोपीची नावे आहेत. त्यांचे ताब्यात एक दुचाकी होंडा शाईन मो. सायकल नंबर- एम एच-42-एन-1020 हि व एक पोको कंपनीचा मोबाईल व एक कार्बेन कंपनीचा मोबाईल मिळाले आहेत. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयांनी त्यांची दिनांक 04 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपीनी याअगोदर अशाच प्रकारचे गुन्हे दौंड, श्रीगोंदा, अकलुज, बारामती, रांजणगाव, चाकण येथे केल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. सदरचे आरोपी हे आंध्रप्रदेश या परराज्यातील अट्टल गुन्हेगार असून ते शहरी भागात भाड्याने खोली घेऊन वास्तव्य करतात व आजूबाजूच्या परिसरातील बँकांची टेहळणी करून, सावज हेरून, वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून बँकेत पैसे जमा करण्यास येणाऱ्या तसेच बँकेतून पैसे काढणाऱ्या सामान्य जनतेला लुटण्याचे काम करत होते. त्यांना अटक करण्यास शिरुर पोलीस स्टेशनला यश आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, अभिजित पवार, पोलीस हवालदार संजू जाधव, पो. हवा चव्हाण, पोलीस नाईक अनिल आगलावे, पोलीस नाईक नाथसाहेब जगताप, • पोलिस अंमलदार अण्णासाहेब कोळेकर, पोलिस अंमलदार भोते, संतोष साळुंखे, विनोद काळे, होमगार्ड राहुल चौगुले यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!