Post Views: 454
दर्यापूर मध्ये जे. डी. पाटील महाविद्यालयातील रा.से.यो. विभागाच्या वतीने ‘मिशन युवा स्वास्थ अभियान’ संपन्न, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राबवली लसीकरण मोहीम
दर्यापूर – महेश बुंदे
जे. डी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ‘मिशन युवा स्वास्थ’ अभियान अंतर्गत हे शिबीर भरवण्यात आले.
देशभरात शाळा आणि महाविद्यालये सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या, मात्र अजून लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरता जे. डी. पाटील महाविद्यालयात रा.से.यो. तर्फे ही मोहीम पार पडली. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही त्यांना पहिला डोस दिला गेला तर दुसरा डोस साठी पात्र होण्यासाठीचा कालावधी पूर्ण करणार्यांना दुसरा डोस दिला गेला. या अभियानात कोविड-१९ लसीकरणासाठी कोविशिल्ड लस उपलब्ध होती.
महाविद्यालयाच्या आवारात २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला. नोंदणीसाठी नोडल अधिकारी दिलीप काळमेघ यांनी सहकार्य केले. प्रभारी प्राचार्य डॉ. दीनदयाल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात हा उपक्रम राबवला गेला. या प्रसंगी अधीक्षक डॉ. संतोष डाबेराव यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहकारी दिपमाला मोहोड, विलास धुमाळे यांनी लसीकरणाची जबाबदारी पार पडली. शिबिराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी, प्रा. पंकज काष्ठे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वृक्षाली देशमुख, प्रा. वैशाली चौरपागर डॉ. सुरेंद्र शेजे यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.