अर्धे तिकीट असणाऱ्या नागरीकांना खाजगी वाहनांमधून करावा लागतो प्रवास
दर्यापूर – महेश बुंदे
एसटी बंद झाल्यामुळे सर्व सामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या प्रकरणी तातडीने संप मिटवावा तसेच बसेस सुरू कराव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे. गत तीन महिन्यापासून विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड असे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव शाळेत जाणे बंद करावे लागले आहे. शासनाने गत दोन महिन्यांपासून शाळा सुरू केल्या परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे.
यामुळे बस सेवा बंदच आहे. या कारणाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस हा एकमेव पर्याय होता परंतु लालपरी बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांचे व सामान्यांचे बस अभावी प्रचंड असे हाल होत आहेत. आता येणाऱ्या मार्च महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहेत यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते परंतु एसटीचा संप असल्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी कसे येणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शासनाने कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटवावा व एसटी सुरू करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. ६० वर्षावरील नागरिकांसाठी बसमध्ये अर्धे तिकीट असते परंतु आता अशा नागरिकांनाही खाजगी वाहनाने ज्यादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे तसेच बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांना खाजगी वाहनांमधून प्रवास करताना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुलींना एसटीमधून मोफत प्रवास सवलत आहे परंतु या मुलींनाही शाळेत येणे अवघड झाले आहे. बस स्थानकाकडे कोणीच फिरकेनासे झाले आहे.