मोशीतील ग्रामदैवत श्री.नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्यात

प्रतिनिधी सुनील बटवाल

चिंबळी दि२८( वार्ताहर)  मोशीतील ग्रामदैवत श्री.नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली असून बुधवारी (दि.२ ) रोजी होणाऱ्या भंडारा उत्सवामध्ये लाखोच्या संख्येने भाविक  उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी देवस्थानने प्रसादाची तयारी सुरू केली आहे.यंदा मोठ्या जल्लोषात यात्राउत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती नागेश्वर महाराज देवस्थान व इतर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते पाटील यांनी दिली आहे.

महाशिवरात्री नंतर मोशी यात्रेस सुरुवात होते.सर्वप्रथम भंडारा उत्सव,उरूस,लिलाव,आखाडा असे स्वरूप असते यंदा हा उत्सव बुधवारी सुरू होत असून बुधवारी भंडारा,गुरुवारी (दि.३) रोजी मुख्य यात्रा पार पडणार असून यात विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच करमणुकीसाठी रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पार पडणार आहे. शुक्रवारी (दि.४) आखाडा संपन्न होणार आहे.

यात नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत.यात्रेची जोरदार तयारी सुरू असून मंडप व विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.आमराई भांडारा उत्सवासाठी जागा स्वच्छ करण्यात येत आहेत.चिमुकल्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळणी,पाळणे दाखल होत असून पाळणे उभारण्याचे काम अंतिम टप्यात आहे.विविध वस्तूंची दुकाने देखील सजू लागली असून गावात उत्सवाला रंग चढू लागला आहे.शिवरात्री पासूनच भाविकांनी मंदिर परिसर व आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी होत असते.शहर परिसर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी भंडारा उत्सवामध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतात.

भंडाऱ्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी व शेकभाजी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.यात्रेच्या दिवशी होणाऱ्या लिलावासाठी ग्रामस्थांची सकाळपासुनच मंदिरात हजेरी असते.उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते.त्यामध्ये प्रामुख्याने नारळ,पेढे,फोटोसह महाप्रसाद बनविण्यासाठी आणलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो.ग्रामस्थांकडून महाप्रसाद बनविण्यासाठी लागणारी भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.

दोन वर्षांनी येणार यात्रा उत्सवाला बहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षे मोशी नागेश्वर महाराज यात्रेवर मर्यादा आल्या होत्या.यंदा मात्र मोठ्या जल्लोषात यात्रा पार पडणार असून यात्रे बरोबरच लहान मुलांसाठी मनोरंजन नगरी,महिलांसाठी खरेदीची दुकाने,भविकांसाठी प्रसादाची दुकाने अशा विविध गोष्टींची रेलचेल असणार आहे. याबरोबरच कुस्ती शौकीनांसाठी निकाली कुस्त्यांचा आखाडा,लोकनाट्य तमाशा आदी कार्यक्रम देखील यंदा होणार आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!