स्वच्छ सर्वेक्षण व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आयोजन
दर्यापूर – महेश बुंदे
स्वच्छ सर्वेक्षण- २०२२ व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दर्यापूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि. २३ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान पंधरा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाला दि. २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने शहरातील पुतळे स्वच्छता व शहर स्वच्छता करून शुभारंभ झाला. दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी मुलांची मॅरेथॉन स्पर्धा आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तसेच दुपारी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधव यांचा सत्कार समारंभ व वृक्षारोपण संपन्न झाले.
दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता नगरपरिषद येथे नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी यांची प्रभातफेरी व सामुहिक हरित छपत, प्रत्येक प्रभागात विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांच्या वतीने स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि. १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या द्वारे शहरातील कचरा व इ-कचरा गोळा करणे व घनकचरा व्यवस्थापन जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

दि. २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व शासकीय कार्यालय येथे सायकल रॅली, सामूहिक हरित छपत तसेच पृथ्वी, अग्नी, वायू, जल, ऊर्जा यावर ऑफलाइन वक्तृत्व स्पर्धा, ऑनलाइन निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा व प्रत्येक शासकीय कार्यालयात वृक्षारोपण आयोजित करण्यात आले आहे.
दि. ३ मार्च रोजी नगरपरिषद येथे सकाळी ११ वाजता बचतगट तर्फे पथनाट्ये व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पथनाट्ये तसेच रांगोळी स्पर्धा व वृक्षारोपण आयोजित करण्यात आले आहे.
दि. ४ मार्च रोजी नगरपरिषद येथे सकाळी ११ वाजता टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे प्रदर्शनी व कलाकुसर आणि वृक्षारोपण आयोजित करण्यात आले आहे. दि. ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वा. का.धर्माधिकारी नगरपरिषद शाळा येथे अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या कर्मचारी वर्गाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
