नांदगाव खंडेश्वर
(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वीज ग्राहकांचे कोरोना काळात कंपनीने विज बिल सादर न केल्यामुळे थकित राहिलेत. त्याला ग्राहक जबाबदार नसून त्या काळातील जागतिक महामारीचे संकट व वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापन जबाबदार आहे. मात्र यासाठी आता ग्राहकांना वेठीस धरून संपूर्ण विज बिल भरून घेण्यासाठी सातत्याने ग्राहकांवर दबाव आणून तगादा लावण्यात येत आहे.
आर्थिक परिस्थितीने त्रासलेल्या ग्राहकाचे विज बिल थकीत राहिल्यास त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे व त्याला अंधारात आपले जीवन कंठावे लागत आहे.
शासन व वीज वितरण कंपनी ग्राहकांना आदिम काळात घेऊन जात असून एका बाजूला माणसाच्या प्रगतीचा डंका वाजवत असताना दुसऱ्या बाजूला ग्राहकांना अंधारात ठेवत आहे.
दिल्लीसारख्या राजधानीच्या प्रांतात येथील आम आदमी पार्टीच्या केजरीवाल सरकारने मोफत वीज दोनशे युनिट पर्यंत देण्यात येत आहे.मात्र दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात ग्राहकांना अंधारात ठेवत आहेत .यांना माणसाची कोणतीही कदर नसून सत्ता मिळविण्यासाठी केवळ मतदारांच्या हिताच्या गप्पा मारल्या जातात.
यावेळी सर्व संबंधित राजकीय सत्ताधिशांचे तोंडे शिवले गेले आहेत अशी जळजळीत प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत.
सुरुवातीला थकित वीज बिलात अनेक राज्याने दिलेल्या सवलती प्रमाणे महाराष्ट्रातही वीज ग्राहकांना सवलत मिळेल अशी भाबडी आशा वीज ग्राहकांची होती.मात्र महाराष्ट्राच्या निगरगट्ट आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही व आता ग्राहकांकडून जबरदस्तीने सावकाराप्रमाणे व्याज लावून वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे.
वीज ग्राहकांच्या बिलावर सावकारा प्रमाणे 18 टक्के व्याजा आकारून व्याजावरही व्याज लावण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात शंभर रुपये किमतीची असलेले मीटर कायम स्वरूपी भाड्याने दाखवून ते भाडे ग्राहकांकडून दरमहा मीटर भाडे ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे. नांदगाव खंडेश्वर वीज वितरण कार्यालयातील संबंधित कर्मचारी पाटील व चितळे यांच्या ग्राहकाशी उद्धटपणे वागण्याच्या व अरेरावीच्या भाषेमुळे ग्राहक संतप्त झाले आहेत.
याबाबत अनेक वेळा संबंधित कर्मचाऱ्यांचे वाद-विवाद कार्यालयात होत आहेत.
शासकीय कामात अडथळाच्या तक्रारी करून अनेक राजकीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनावर ३५३चे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.त्यामुळे याबाबत सर्वत्र संतोष खदखदत आहे. या परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी दिला आहे.
प्रतिनिधी रवि मारोटकर :-