दर्यापूर – महेश बुंदे
श्री संत गजानन महाराज मंदिर व पंचक्रोशीतील समस्त गावकरी मंडळ कोकर्डा तर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता उद्या दि. २३ सकाळी ११.३० वाजता पारायण वाचक सौ. संध्याताई देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्त यज्ञ, पूर्णाहुती, भागवत पूजन, आरती होणार आहे. दिनांक १५ ते २३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू होता. हा कार्यक्रम सकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत श्री संत गजानन महाराज मंदिर येथील परिसरात झाला. सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात आध्यात्म, विज्ञान, भक्तिरस आणि सुमधूर संगीताने भाविकांना मंत्रमुग्ध केले. सप्ताहाचे उद्घाटन श्री संत अंबादास महाराज यांच्या हस्ते झाले.

या सप्ताहामध्ये भागवताचार्या गोपाल महाराज (कारखेडकर) यांनी भागवत माहात्म्य सांगून सद्य चालू परिस्थितीबाबत लोकांचे प्रबोधन करून समाज जागृतीचे धडे दिले. होळी उत्सव, बलिवामन कथा, कृष्ण जन्मोत्सव, कृष्ण बाललीला, गोवर्धन उत्सव, मथुरा गमन व कंस वध, रुक्मिणी विवाह, भागवत पूजन, पुर्णाहुती यज्ञ यासह रोज भागवत, काकडा, आरती, हरिपाठ व हरिकीर्तन, अन्नदान असे विविध कार्यक्रम या सप्ताहात झाले. सात दिवसापासून सुरू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.
आज २२ व्या शतकातही भगवान श्रीकृष्णांच्या दिव्यलीला मानव समाजाला अध्यात्म ज्ञानाद्वारे (ब्रह्मज्ञानाद्वारे) शाश्वत भक्ती मार्गावर अग्रेसर करण्यासाठी ठरत आहे. आध्यात्मिक रहस्यांनी ओतप्रोत असलेल्या लीलांना श्रीमद्भागवत महापुराणाच्या आधारे समाजासमक्ष प्रकट करणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रमुख उद्देशासाठी हा सप्ताह आयोजित केला होता,’ असे आयोजकांनी सांगितले.

२३ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. प्रमोद महाराज रहाणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे.
पारायण प्रमुख म्हणून सौ. संध्याताई देशपांडे जबाबदारी सांभाळणार आहे. ह. भ. प. बालयोगी गुरुवर्य गोपाल महाराज कारखेडकर यांनी भागवत कथा निरुपण केले.
सप्ताहातील किर्तनकार