मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांसह जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती
दर्यापूर – महेश बुंदे
न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देण्याचा न्यायालयाचा संकल्प आहे या माध्यमातून गेली अनेक वर्ष न्यायालय कार्य करीत आहेत, बऱ्याच ठिकाणी न्यायालयांच्या इमारतीचा प्रश्न निर्माण होतो याला राज्य शासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सहकार्य मिळते, न्यायालययांच्या अध्यायावत सुसज्ज इमारती असणे खूप गरजेचे आहे.
समाजातूनच न्यायाच्या अपेक्षेने येणाऱ्या सामान्य नागरिकाची या माध्यमातून सेवा होत असते, इमारती सुसज्ज नसल्या तर न्यायालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो असे प्रतिपादन मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल शरदचंद्र चांदुरकर यांनी व्यक्त केले. दर्यापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन दि. २१ फेब्रुवारी २०२२ ला दर्यापूर येथील सिव्हील लाईन भागात न्यायालय परिसरात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल शरच्चंद्र चांदुरकर व न्यायमूर्ती गोविंदा आनंदराव सानप हे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र मधुसूदन जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती, न्यायाधीश मिलिंद कुमार बूराडे, दर्यापूर वकील संघाचे अध्यक्ष नामदेव थर्डक मंचावर होते. कार्यक्रमाचे आयोजन दर्यापूर वकील संघ व दर्यापूर येथील न्यायालयाच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी विशेष निमंत्रित म्हणून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे हे उपस्थित होते. १९०२ मध्ये दर्यापूर न्यायालयाची स्थापना झाली १९०८ मध्ये प्रथम न्यायालयाची वास्तु निर्माण झाली ती वास्तु जीर्ण झाल्यामुळे १९८३ मध्ये तत्कालीन शासनाच्या वतीने नवीन वास्तू उभारण्यात आली. सदर वास्तू सुद्धा जीर्ण झाल्याने व प्रशस्त नसल्यामुळे सन २०१८ मध्ये नवीन वास्तूच्या निर्माण करता प्रशासनाची मंजुरी घेण्यात आली एकूण १८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यातील चार कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत सदर इमारत पूर्ण होणार आहे, या इमारतीमध्ये दिव्यांग व्यक्ती करता विशेष व्यवस्था, पक्षकार साठी बसण्याची व्यवस्था, वकील संघाच्या करता बाररूम, यासह अद्ययावत लायब्ररी, संगणक कक्ष, न्यायदानासाठी विशेष कक्ष राहणार असून एकूण तीन मजली इमारत असणार आहे, या इमारतीमध्ये एकूण पाच न्यायालय काम करणार आहेत यासह जिल्हा न्यायाधीशांचे कोर्ट सुद्धा दर्यापुरात व्हावे अशी मागणी यावेळी दर्यापूर वकील संघाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीसमोर करण्यात आली.
