शेतपिकांची पाहणी , शेतकरी बचतगटांशी साधला
संवाद , अवजार बँक व जलसंधारण
कामाची पाहणी
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-रिसोड तालुक्यातील नेतनसा,कंकरवाडी व आगरवाडी येथील शेतकरी बचतगटांना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी १८ फेब्रुवारी रोजी भेट दिली.यावेळी शेतातील पिकांची पाहणी करून बचतगटांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच अवजार बँक व जलसंधारण कामाची देखील पाहणी केली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.आकोसकर,तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप,तंत्र अधिकारी श्री कंकाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नेतनसा येथील शेतकरी दीपक बाजड व गजानन बाजड यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली. महाज्योतीअंतर्गत लावलेल्या करडई पिकाची तसेच सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या गहू पिकाची पाहणी केली. संत्रा व नवीन पद्धतीने लावलेल्या मोसंबी पिकाची देखील पाहणी केली. मोसंबीत घेण्यात येत असलेल्या आंतरपिकाची पाहणी करून श्री. बाजड यांच्याकडून माहिती जाणून घेतली.यावेळी बाजड यांच्या दालमिलचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.श्री.गजानन बाजड यांच्या शेतात भाजी-भाकर व रोडग्याचा त्यांनी आस्वाद घेतला.
