प्रतिनिधी नीरज शेळके
ठाणे वार्ता :- ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘बिईंग मी’ ही समिती कार्यरत आहे. ही एक पाचवर्षीय मोहीम आहे. तृतीयपंथी , दिव्यांगजन, वयोवृद्ध व्यक्ती या समाजघटकांबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समाजमनात संवेदना निर्माण करणे, स्त्रियांसंबंधी गंभीर आजारांबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवणे हा ‘बिंईंग मी’ समितीचा मुख्य हेतू आहे.
समाजात आपल्या परिश्रमाच्या जोरावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या व तृतीयपंथीयांच्या न्याय-हक्कांसाठी लढणाऱ्या प्रतिभावंत तृतीयपंथीयांचा विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष संवाद व्हावा, जेणेकरून तृतीयपंथीयांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञान समूळ नष्ट करता येईल या हेतूने, ‘भारतातील पहिल्या महिला तृतीयपंथी फोटो-पत्रकार झोया लोबो’ यांच्या ‘फोटोग्राफी वर्कशॉप’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन दि.१७ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालयासाठी व १८ फेब्रुवारी रोजी वरिष्ठ महाविद्यालयासाठी करण्यात आले होते.
गणित विभाग, बीएमएम विभाग, कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक व स्पर्धा समिती व बिईंग मी समितीच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी बिईंग मी सल्लागार सदस्य व संस्थेच्या सह-सचिव मानसी प्रधान, उपप्राचार्या व बिईंग मी समितीप्रमुख डॉ.मृणाल बकाणे, प्रभारी प्राचार्य डॉ.भूषण लांगी, उपप्राचार्य प्रा.सीताराम वाहुळे डॉ.स्वाती गुजर, डॉ.सारिका सागर प्रा.नयना राठोड यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम समन्वयक डॉ.प्राची बाकळे व प्रा.महेश कुलसंगे यांनी नियोजनात मोलाची भूमिका निभावली.
