प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे संगितमय अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. बुधवारी सायंकाळी इंझोरी या गावी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने तुझ गावच नाही का तिर्थ हा स्वच्छता जनजागृती चा रथाचे आगमन झाले असता जिल्हा परिषद सदस्या सौ.विनादेवी अजय जैस्वाल आणि इंझोरी गावचे सरपंच हिम्मतराव राऊत यांनी रथा सोबत जिल्हा भर गाडगे बाबांच्या वेशभूषा करून समाज प्रबोधन करणारे व स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी अविरतपणे प्रबोधन करणारे पी एस खंदारे यांना अखंड हरिनाम सप्ताहात घेऊन स्वच्छता व हागनदरी मुक्त गाव आणि घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदी विषयांवर आपल्या कल्पकतेने अस्सल व-हाडी भाषेत गाडगे बाबांच्या आवाजात उपस्थित जनतेला मंत्रमुग्ध केले.
संत श्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज, निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा,संत सावता माळी, संत चोखोबा, संत रविदास आदी संताची स्वच्छता विषयक व मानवतावादी परंपरा आपल्या मिस्कील भाषेत पी एस खंदारे यांनी मांडली व जनतेची मने जिंकून जनजागृती केली. शेवटी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाच्या जयघोषात समारोप करण्यात आला.
