अमरावती/ मोझरी:-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा यंदा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव आहे. गुरुकुंज मोझरी येथील महासमाधीवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं.पहाटे चार वाजता ब्रम्हमुहूर्तावर तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
तीर्थ स्थापनेने व सामुदायिक ध्यानाने पुण्यतिथी महोत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात केली.आकर्षक रोषणाई आणि फुलांनी महासमाधी सजवण्यात आली. 25 तारखेला तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
दरवर्षी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. परंतु कोरोनामुळे यावर्षी महाराजांचा 53 वा पुण्यतिथी महोत्सव तिथीनुसार 25 ऑक्टोंबर रोजी साध्या पद्धतीने ऑनलाइन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
विशेष म्हणजे सर्वत्र आरोग्याची बिकट परिस्थिती पाहता यावेळी पहिल्यांदाच पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संपूर्ण राज्यात जिल्हा स्तरावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पंचक्रोशीतील गुरुदेव भक्तांनी 25 ऑक्टोंबर रोजी होऊ घातलेला मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण श्री गुरुदेव टि. व्ही. या युट्यूब चॅनेलवर पाहण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून करण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रचार प्रमुख दामोधर पाटील, ग्रामगीता विभाग प्रमुख गुलाबराव खवसे, डॉ. राजाराम बोथे आदी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशसेवेला नेहमीच प्राथमिकता दिली आहे. तेव्हा देशहितासाठी पुण्यतिथी महोत्सव साजरा न करणे हेसुद्धा महाराजांच्या विचारांना अनुसरूनच आहे.
