प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम : जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच जलसंधारणाच्या योजनाही अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज 5 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून येथे राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांची माहिती श्री. कोश्यारी यांनी यावेळी घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबवावीत. इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर सिंचन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. असे कार्यक्रम जिल्ह्यात सर्वदूर राबवावेत. सिंचनाचे क्षेत्र वाढल्यास कृषी उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश राज्यपालांनी यावेळी दिले.
