अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अमरावती जिल्हा सहकार बोर्ड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत २१ संचालकपैकी १८ संचालक अविरोध निवडून आले असल्याने उर्वरित ३ संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये दर्यापूर व अंजनगाव सेवा सोसायटी मतदारसंघ आणि ओबीसी प्रवर्ग अशा तीन जागेसाठी दि. २९ जानेवारी रोजी अमरावती येथील विभागीय सहकार बोर्ड येथे निवडणूक पार पडली. यामध्ये दर्यापूर सेवा संघ मतदारसंघात एकूण ६९ मतदार होते, त्यापैकी ५८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये सहकार पॅनलचे सुधाकर पाटील भारसाकळे एकतर्फी विजय प्राप्त करत ४२ मते घेतले तर प्रतिस्पर्धी मदन पाटील बायस्कार यांना १६ मते पडली.
तर अंजनगाव सेवा संघात बाळासाहेब चऱ्हाटे यांना ४० पैकी २५ मते पडली तर शशिकांत मंगळे यांना १५ मते पडली. ओबीसी प्रवर्गातून रामेश्वर विधळे हे विजयी झाले आहे. या तीनही जागेवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. आज जाहीर झालेल्या अमरावती जिल्हा सहकार बोर्ड निवडणूकीच्या निकालात सहकार पॅनलचे सक्षम नेतृत्व, सहकार नेते, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सहकार पॅनलने विजय प्राप्त केला आहे. तसेच दर्यापूर तालुका हा सहकार पॅनलचा अभेद गड असल्याचे सिध्द झाले आहे. दर्यापूर सेवा संघातून सुधाकर पाटील भारसाकळे विजयी झाल्याने त्याचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे. आधी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार यांचा दारुण पराभव करत विजयी होत अध्यक्ष पदाची धुरा सुधाकर पाटील भारसाकळे सांभाळत आहेत. आता जिल्हा सहकार बोर्ड निवडणूकीत सुद्धा विजय प्राप्त केल्याने दर्यापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक सक्षम नेतृत्व सुधाकर पाटील भारसाकळे ठरले आहे. आता यावर्षी दर्यापूर तालुक्यात होणाऱ्या दि दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत सहकार पॅनल सक्षम पर्याय राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.