ब्रेक द चेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे/मोकळ्या जागेतील सांस्कृतीक कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सुचना जारी

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग कायद्यामधील तरतूदीची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून लागू केली आहे. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे/ मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियंत्रित स्वरुपात सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षन्मुगराजन एस. यांचे हे सुधारीत आदेश 22 ऑक्टोबरपासून संपूर्ण वाशिम जिल्हयात लागू राहतील.

बंदिस्त सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारिरीक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश दयावा, ही सभागृह व्यवस्थापनाची/आयोजकांची जबाबदारी राहील. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये, बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील. बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील. बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेतू उपयोजन (ॲप) सुसंगत साधनांवर स्थापित करुन ते दिवसभर सुरु ठेवावे. बालकलाकारां व्यतीरिक्त सर्व कलाकार/ आयोजक व साहृभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेला असणे आवश्यक आहे. बाल कलाकारांची आरोग्य सेतू ॲप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित अशी दर्शिविलेली असणे आवश्यक राहील.

सभागृहातील सर्व परिसर/ खोल्या/ प्रसाधन गृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखावे व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. बंदिस्त सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील. सभागृहातील कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठी सहाय्यक कामे त्या त्या कामासाठी नेमून दिलेल्या व्यक्तीनीच करावी. कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री उदा. संगीत व्यवस्था/लॅपटॉप/माईक प्रकाश योजना इत्यादी जी कोण व्यक्ती हाताळणार असेल. त्यांनीच ती वापरावी, याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने-त्याने स्वत:चीच साधन सामुग्री वापरावी. बंदिस्त सभागृहामध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई किट धारण करणे आवश्यक आहे. बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार, प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नसेल. परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा-स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलबध्द ठेवावे.

श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करावे. खोकताना/शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने अर्थात टिश्यु पेपर/हात रुमालाने/कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची अर्थात टिश्यू पेपरची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोविड-19 च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाय-योजनांवरील भित्तीपत्रके /उभे फलक झळकविण्यासाठी उपाययोजना करण्यात व्यावात. सभागृह वातानुकुलीन असेल अशा ठिकाणी तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. खाद्य व पेय पदार्थाच्या क्षेत्रामध्ये, शक्य असेल तेथे अनेक विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्यात यावीत. प्रेत्यक विक्री केद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्या अर्थात स्टिकर वापरुन एक रांग पध्दतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/ प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थ्यांची व पेय पदार्थ पोहचविण्यास मनाई राहील.

आयोजक व कार्यक्रमासाठी सहाय्य करणारे कर्मचाऱ्यासाठी मार्गदर्शन तत्वे : बंदिस्त सभागृहात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. वयाने ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे. असे कर्मचारी यांना ज्या ठिकाणी जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमण्यात येऊ नये व त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी. कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा. सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याबाबत सजगता दाखवावी व आपल्याला असणाऱ्या आजाराबाबत तात्काळ व्यवस्थानाच्या निदर्शनास आणावे.

बंदिस्त सभागृहाव्यतिरीक्त मोकळ्या जागेत आयोजीत होणारे कार्यक्रम : मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी 6-6 फुटांवर खुणा करुन त्यानुसार लोक बसण्याची/ उभे रहाण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील/ उभे राहतील, याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणाऱ्या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी 6 फुट अंतरावर असावेत. कार्यक्रम /कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य राहील. बालकलाकरा व्यतिरीक्त सर्व कलाकार/ कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. बाल कलाकारांची आरोग्य सेतू ॲप वरील आरोग्य दृष्टया वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ जसे की, तंबाखूजन्य पदार्थ व पान हे बाळगण्यास मनाई राहील. नशा आणणाऱ्या पदार्थ्यांचे /द्रव्यांचे सेवन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत, व आयोजकांनी तपासणी करुनच प्रवेश द्यावा.

गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी. मोकळे मैदान, रस्ता खुले सभागृह, इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार असल्यास, कार्यक्रम पाहण्यासाठी उभे राहणे अथवा बसणे याकरीता मार्किंग करावे. ज्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणविषयक नियम पाळून ध्वनीक्षेपकावरुन सूचना द्याव्यात. अनियंत्रित गर्दी होणाऱ्या रस्त्यावरील कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन परवानगी द्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ/ पेये विक्रीस बंदी राहील. कार्यक्रम सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे नेपथ्य, प्रकाश व ध्वनी यंत्रणा, मंडप व मंडपाचे साहित्य, सजावट साहित्य यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. माझे कुटूंब माझी जबाबदारीला अनुसरुन शक्य असेल तेथे कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत ध्वनीफित तसेच संबंधित फलक लावावेत. राज्य शासनाच्या वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्थानिक कोविड-19 साथरोग परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी हे संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनियम करुन वरील निर्बंधामध्ये वाढ करु शकतात.

सर्व संबंधितांनी बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रमांचे परिचालन, कोविड-19 संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही अशा पध्दतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोविड-19 विषाणूंच्या प्रादूर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील.
वरील नियमाचे उलंघन केल्यास अशी व्यक्ती भारतीय दंड संहिता-1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधीतावर सदर कलमानुसार व साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतील. हे आदेश 22 ऑक्टोबर 2021 पासून संपुर्ण वाशिम जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागाकरीता लागु राहील.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!